Nagpur News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे नागपूरमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वर्धा रोडवर शेकडो वाहने खोळंबून पडली आहेत. मंगळवारी पर्याय म्हणून अनेकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केला होता. मात्र आता तोसुद्धा आंदोलकांनी बंद पाडला आहे. या रस्त्यावर टायर जाळून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला आहे. त्यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्यासोबतच नागपूर-वर्धा, नागपूर-जबलपूर, नागपूर हैदराबाद हे महागार्ग ही जाम झाले आहेत.
महाएल्गार आंदोलनासाठी हजारो शेतकरी नागपुरात आले. त्यामुळे शहरातील मुंबई पुण्याकडे धावणाऱ्या ट्रॅव्हल्सही हिंगणा मार्गाने वळविण्यात आल्या. आंदोलनात राज्यभरातून शेतकरी मिळेल त्या वाहनाने दाखल झाले आहेत. अमरावती महामार्गावर चक्काजाम सुरू असल्याने सर्व आंदोलकांची वाहने या मार्गाने नागपूर शहरात दाखल होत होती. त्यामुळे सायंकाळी सात वाजतापासून हिंगणा मार्गावर चक्काजाम सुरू होता. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या खासगी बसेस याच मार्गाने धावताना दिसल्या. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली.
महाल परिसर, सीए रोड, गांधीबाग, इतवारी, गोळीबार चौक व सभोवतालचे प्रमुख रस्ते तसेच एलओएसए क्र. 93 जवळील मेडिकोज भाग. टिळक पुतळा ते तेलीपुरा, रामझुला मार्गही बंद करण्यात आला होता. हंसापुरी चौक, कमाल टॉकीजकडून जाणारी वाहने वळविण्यात आली होती.
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी महाऐल्गार आंदोलन पुकारले आहे. मंगळवारी सायंकाळपासूनच कार्यकर्ते नागपुराता धडकले. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (क्रांतीकारी) अध्यक्ष रवीकांत तुपकर, अजित नवले यांच्यासह अनेक शेतकरी नेते सहभागी झाले आहेत. या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध संघटना सहभागी झाल्या आहेत.
बच्चू कडू मंगळवारी रात्री सात वाजेच्या सुमारास 500 पेक्षा अधिक ट्रॅक्टर घेऊन आंदोलनस्थळी आले. त्यामुळे वर्धा मार्गावरील संपूर्ण वाहतूक कालपासून ठप्प झाली आहे. कडू यांचे आंदोलन सुरू आहे त्याच मार्गावरून चंद्रपूर, वर्धा, यवमताळ, हैदराबाद आदी शहरातून नागपूरला येता येते. त्यामुळे या मार्गावर अभूतपूर्व कोंडी झाली आहे. बच्चू कडू म्हणाले, शासनाने विधानसभा निवडणूकीपूर्वी संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले. परंतू त्याची पूर्तता करण्यात आली नाही. शासनाने शेतकऱ्यांना गृहित धरल्याने शेतीक्षेत्रासमोर विविध समस्या निर्माण झाल्या आहेत.
अतिवृष्टीच्या भरपाईत देखील दुजाभाव करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा दावा करण्यात आला होता. उत्पन्न तर नाही परंतू खत, डिझेल, पेट्रोल दरात वाढीच्या माध्यमातून त्यांचा उत्पादकता खर्च मात्र दुप्पट, तिप्पट करण्यात आला. मजूरी खर्चातही मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गणीत कोलमडले असल्याचे कडू यांचे म्हणणे आहे.
हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीचा निर्णायक लढा आहे असे सांगत असल्याचे स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सरकारला इशारा दिला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन सरसकट कर्जमाफीवर ठोस भूमिका घेतली नाही, तर राज्यभरातील शेतकऱ्यांचा प्रचंड उद्रेक घडवून आणू असा इशारा सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन मागे होणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.