Bacchu Kadu & Eknath Shinde. Sarkarnama
विदर्भ

Amravati : विषयच खल्लास..! बच्चू कडूंनी सांगून टाकले महाविकास आघाडीबद्दल..

Bacchu Kadu : एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार नसल्याचे केले जाहीर; पदावरून नाराजीही नाही

जयेश विनायकराव गावंडे

Kuralpurna Village : राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीमुळे चर्चेत आलेले प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते तथा अचलपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बच्चू कडू यांनी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले नेते आहेत. शिंदे हे जोपर्यंत महायुतीमध्ये आहेत, तोपर्यंत आपण त्यांना सोडून जाण्याचा प्रश्नच येत असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी (ता. 28) अमरावती जिल्ह्यातील कुरळपूर्णा या आपल्या गावी बोलताना स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बच्चू कडू यांची गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. या भेटीच्या दोन दिवसांपूर्वी पासून बच्चू कडू यांच्याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते महायुतीवर नाराज होते. मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची पाठराखण करीत प्रसंगी सरकारविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला होता.

अलीकडेच नागपूर येथे झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि मराठा आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवरही टीका केली. त्यामुळे ते सत्तेतून बाहेर पडतात की काय, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. अशातच डॉ. पंजाबराव देशमुख जयंतीच्या निमित्ताने अमरावतीत आलेल्या शरद पवारांनी आमदार बच्चू कडू यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर चर्चांना वेग आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तिवसा मतदार संघाच्या काँग्रेस आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी तर बच्चू कडू महाविकास आघाडीमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे कडू महायुतीला रामराम ठोकत पवारांच्या साथीने महाविकास आघाडीत येतात की काय, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र पवार हे कुरळपूर्णातून बाहेर पडत नाही तोच बच्चू कडू यांनी आपण महाविकास आघाडीत जाणार नाही, असे स्पष्टच करून टाकले आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे पक्षातून बाहेर पडले. त्यावेळी आमदार बच्चू कडू यांनी त्यांची साथ दिली. अपक्ष आमदार असलेल्या कडू यांची सुरुवातीपासूनच शिंदे यांना साथ राहिली आहे. अशात मंत्रीपदावरून असलेली कडू यांनी नाराजी दूर करण्यासाठी त्यांना दिव्यांग महामंडळाचे अध्यक्ष करीत राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला. त्यानंतरही बच्चू कडू नाराज असल्याचे सांगण्यात येत होती. मात्र अशी कोणतीही नाराजी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT