Bacchu Kadu, Ajit Pawar, Devendra Fadanvis and Sharad Pawar.
Bacchu Kadu, Ajit Pawar, Devendra Fadanvis and Sharad Pawar. Sarkarnama
विदर्भ

Bacchu Kadu : ‘त्या’ शपथविधीबद्दल शरद पवारांना माहिती नव्हती; हे शक्य नाही, कारण...

सरकारनामा ब्यूरो

Bacchu Kadu News : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सकाळच्या त्या शपथविधीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. अजित पवार सकाळी शपथ घेणार आहेत, हे शरद पवारांना माहिती नव्हतं, असं घडलं असल्याची शक्यता फार कमी आहे, असे प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू म्हणाले.

आज नागपुरात याबाबत बच्चू कडूंना विचारले असता ते म्हणाले, शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे. त्यांना राजकारणातील हवेची दिशा कळते, त्यांना कणाकणाची माहिती असते. ते बारामतीमध्ये जरी असले, पुण्यात जरी असले, तरी धारणी, गडचिरोलीमध्ये काय सुरू आहे, याची इत्थंभूत माहिती त्यांना असते. त्यांची यंत्रणा फार जबरदस्त आहे. त्यामुळे त्या शपथविधीची माहिती पवारांना नसणे, हे अनाकलनीय आहे.

दुसरा प्रश्‍न असा आहे की, अजित दादांनी बंडखोरी केली आणि पवार साहेबांना न सांगता त्यांनी हे केले असेल. तर शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना माझा प्रश्‍न आहे की, अजित दादांनी, म्हणजेच घरातल्या माणसाने, ज्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस उभी केली. ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, त्या अजित दादांनी बंडखोरी करून देवेंद्र फडणवीसांसोबत शपथविधीला जावे. त्यांच्या पक्षाच्या विचाधारेला तिलांजली देऊन ते शपथविधीला गेले. येवढे करूनही त्यांनी उपमुख्यमंत्री बनावे, हे पटण्यासारखे नाही, असे बच्चू कडू म्हणाले.

जे पक्षात निष्ठेने काम करीत राहिले, पक्षाशी प्रामाणिक राहिले, ते मागे राहिले आणि बंडखोरी करणारे उपमुख्यमंत्री झाले, हे कसे काय शक्य आहे. यामध्ये दोन गोष्टी घडल्या असल्याची शक्यता आहे. पहिली म्हणजे, शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितले म्हणूनच अजित दादा शपथविधीला गेले. दुसरी म्हणजे शरद पवारांनी न सांगता जर अजित दादा (Ajit Pawar) गेले, तर मग त्यांना उपमुख्यमंत्री का बनवले? म्हणजे जो बंडखोर आहे, तो मजबूत होतो, हेच अजित पवारांनी सिद्ध केले नाही का, असा प्रश्‍न बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केला.

पिंपरी चिंचवड आणि कसब्यामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आम्ही जाण्याचा प्रश्‍न नाही. त्या निवडणुकीसाठी आमचा पाठिंबा सत्ताधाऱ्यांना आहे. तशी गरज पडली आणि सांगण्यात आले तर आम्ही तेथे जाऊ. आम्ही आता आपली तयारी केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत आणि १० ते १५ ठिकाणी उमेदवार उभे करू. मागच्या निवडणुकीत आमचे दोन उमेदवार १० ते १५ हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले. आगामी निवडणुकीसाठी आम्ही तेथे मजबुतीने पुढे जात आहोत. व्यवस्थित नियोजन करून आम्ही निवडणुकीची तयारी करीत आहोत, असेही बच्चू कडू म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT