Bacchu Kadu
Bacchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Bacchu Kadu : जे बंडखोरी करतात, त्यांनाच मोठी पदे मिळतात; विश्‍वास नसेल तर इतिहास बघा !

सरकारनामा ब्यूरो

Bacchu Kadu News : राजकारणात केव्हा काय होईल, हे सांगता येत नाही. पण बंडखोरी केल्याने नक्कीच काहीतरी चांगले होऊ शकते. कारण राजकारणात आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली, त्यांना मोठी पदे मिळालेली आहेत. विश्‍वास नसेल तर इतिहास बघा, असे म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी इतिहासातले काही दाखले दिले.

यासंदर्भात आज नागपुरात बोलताना बच्चू कडू म्हणाले, जे पक्षात निष्ठेने काम करीत राहिले, पक्षाशी प्रामाणिक राहिले, ते मागे राहिले आणि २०१९ मध्ये बंडखोरी करणारे अजित पवार नंतर उपमुख्यमंत्री झाले, हे कसे काय शक्य आहे. यामध्ये दोन गोष्टी घडल्या असल्याची शक्यता आहे.

पहिली म्हणजे, शरद पवारांनी सांगितले म्हणूनच अजित दादा शपथविधीला गेले. दुसरी म्हणजे शरद पवारांनी न सांगता जर अजित दादा गेले, तर मग त्यांना उपमुख्यमंत्री का बनवले? म्हणजे जो बंडखोर आहे, तो मजबूत होतो, हेच अजित पवारांनी सिद्ध केले नाही का, असा प्रश्‍न बच्चू कडू यांनी केला.

इतिहासातले काही दाखले देताना ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मतदारांच्या विरोधात बंडखोरी केली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत ते जाऊन बसले आणि ते मुख्यमंत्री झाले. जे बाळासाहेबांचे विचार होते, त्याप्रमाणे त्यांनी सामान्य माणसाला मुख्यमंत्री नाही बनवले, तर स्वतः खुर्चीत जाऊन बसले. आता बंडखोरी ज्यांनी ज्यांनी केली, ते मुख्यमंत्री व्हायला लागले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली. हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासातील बहुधा सर्वात मोठे बंड असावे. तेसुद्धा मुख्यमंत्री झाले. येथेही जे निष्ठावान होते, ते मागे राहिले. बंडखोरांनी मोठी पदे मिळवली आहेत, हा इतिहास आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आमदारांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या दोन्ही बाजूंनी भक्कम आहेत. कागदपत्रांच्या संदर्भातही ते मजबूत आहेत, असे त्यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर बोलताना सांगितले. निवडणूक आयोग (Election Commission) आणि न्यायालय यांचे ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. निकाल येत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असं सध्यातरी दिसतंय आणि या निकालानंतरही विस्तार झाला नाही, तर मग तो २०२४च्या निवडणुकांनंतर होईल, असे बच्चू कडू (Bacchu Kadu) मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT