अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅंकेची निवडणूक सुरुवातीपासून हायप्रोफाईल होती. अनेक कारणांमुळे या निवडणुकीकडे जिल्ह्यासह राज्यातील राजकीय लोकांचे लक्ष लागले होते. आज लागलेल्या निकालामध्ये दिग्गजांचाही पराभव झाला. शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंनी बबलू देशमुख यांचा, तर बबलू देशमुख यांनी दिग्गज नेते संजय खोडके यांचा पराभव केला. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे लक्षवेधी ठरली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदांपैकी चार संचालक बिनविरोध निवडून आल्याने १७ जागांसाठी मतदान झाले होते. मतमोजणी आज गाडगेबाबा समाधी मंदिर परिसरात पार पडली. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत ठरलेल्या चांदूरबाजार सेवा सोसायटी मतदारसंघातून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बबलू देशमुख यांचा पराभव केला. या मतदारसंघात बच्चू कडू यांना २३ तर देशमुख यांना १९ मते मिळाली. दुसरीकडे ओबीसी मतदारसंघातून बबलू देशमुख यांनी परिवर्तन पॅनलचे मुख्य प्रवर्तक संजय खोडके यांचा पराभव केला.
परिवर्तन पॅनलचे नेते संजय खोडके यांच्यासह मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, अकोटचे आमदार व दर्यापूर सेवा सहकारी सोसायटीमधून रिंगणात असलेले प्रकाश पाटील भारसाकळे, सुधीर सूर्यवंशी, डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन बँकेचे अध्यक्ष राजेंद्र महल्ले, अजय पाटील, जयश्री देशमुख, सुनील शिसोदे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या सहकार पॅनलच्या सर्वच उमेदवारांना पाठबळ दिले. त्यांच्या सूचनेवरून पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनीसुद्धा चांगलीच मेहनत घेतली. त्यामुळे जिल्हा सहकारी बँकेच्या या निवडणुकीत सहकार पॅनलने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.
चांदूर रेल्वे सेवा सहकारी सोसायटीमधून माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी २१ मते मिळवून परिवर्तन पॅनलचे किशोर कडू यांचा पराभव केला. दर्यापूर सोसायटीमधून आमदार प्रकाश भारसाकळे यांचा सुधाकर भारसाकळे यांनी तर आमदार बळवंत वानखडे यांनी अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून आमदार राजकुमार पटेल यांचा पराभव केला. विशेष म्हणजे, यंदाची ही निवडणूक अतिशय हायप्रोफाइल झाली होती. कारण त्यात अनेक दिग्गजांनी उडी घेतल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.