MLA Virendra Jagtap and Minister Bacchu Kadu
MLA Virendra Jagtap and Minister Bacchu Kadu Sarkarnama
विदर्भ

माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या घरावर बच्चू कडूंचा ‘प्रहार’

अतुल मेहेरे

नागपूर : अमरावती जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचा निकाल परवा लागला. यामध्ये राज्यमंत्री बच्चू कडू निवडून आले, पण त्यांच्या पॅनलचा मात्र पराभव झाला. त्यानंतर चांदूर रेल्वेचे माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी कडूंच्या विरोधात घोषणाबाजी केली. याचा राग मनात धरून बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार जगताप यांच्या घरावर हल्ला केला.

माजी आमदार जगताप यांच्या घरासमोर घोषणाबाजी करून त्यांचा पुतळा जाळण्यात आला. अमरावती जिल्हा बॅंकेची निवडणूक यावेळी हायप्रोफाईल झाली. कारण यामध्ये शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, सहकारातील ज्येष्ठ नेते संजय खोडके आणि महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी लक्ष घातले होते. या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. निवडणुकीत विजयश्री मिळाल्यानंतर माजी आमदार जगताप, बबलू देशमुख यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अतिउत्साह संचारला होता. संत गाडगेबाबा समाधी मंदिर परिसरातील मतमोजणी केंद्रासमोरही कार्यकर्त्यांचा पोलिसांशी वाद झाला होता. दरम्यान त्यांनी बच्चू कडू यांच्या विरोधात नारेबाजी केली होती, असे सांगण्यात आले आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन नारेबाजी केल्यामुळे प्रहारचे कार्यकर्ते संतापलेले होते. हा वाद विकोपाला जाईल, असे भाकीत तेव्हाच काहींनी वर्तविलेही होते आणि झालेही तसेच. कालचा एक दिवस गेला आणि आज सकाळी प्रहारचे कार्यकर्ते आमदार विरेंद्र जगताप यांच्या चांदुर रेल्वे येथील घरी धडकले आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी आमदार जगताप यांचा पुतळाही जाळला. त्यानंतर या प्रकाराची तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात आली. आमदार बळवंत वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख व काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा जमाव पोलिस ठाण्यात जमा झाला.

घर पेटवण्याचा प्रयत्न...

बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घरावर हल्ला करून घर पेटवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आमदार विरेंद्र जगताप यांनी केला आहे. बच्चू कडू यांनीच कार्यकर्त्यांना हल्ला करायला लावला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावरही हल्ला केला. पराभव झाला म्हणून कडू त्याचा राग अशा पद्धतीने काढत आहेत. राज्यमंत्री असलेल्या व्यक्तीला असे कृत्य न शोभणारे आहे. पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिस योग्य ती कारवाई करतील, असे आमदार जगताप यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT