Backdrop at Vanchit Bahujan Aghadi Meeting. Sarkarnama
विदर्भ

Nagpur : ‘वंचित’च्या नागपुरातील सभेत अचानक पळापळ, कारण...

प्रसन्न जकाते

Vanchit Bahujan Aghadi : मनुस्मृती दहन दिनानिमित्त सोमवारी (ता. 25) नागपूर येथील कस्तूरचंद पार्क येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजित स्त्रीमुक्ती दिन परिषदेच्या कार्यक्रमात अचानक पळापळ झाली. सभेसाठी उभारलेल्या व्यासपीठाच्या मागील भागात उभारलेला ‘बॅकड्रॉप’ लोखंडी अँगलसह अचानक कोसळला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही.

कस्तूरचंद पार्कवर स्त्रीमुक्ती दिन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर, अंजली आंबेडकर यांच्यासह ‘वंचित’चे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. व्यासपीठामागील ‘बॅकड्रॉप’ अचानक कोसळल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पळापळ झाली. त्यांना तत्काळ धाव घेत ‘बॅकड्रॉप’ बाजूला केला.

कस्तूरचंद पार्कवर बहुजन आघाडीची परिषद घेण्यात आली. परिषदेला अॅड. प्रकाश आंबेडकर, ‘वंचित’च्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष निशा शेंडे आदी उपस्थित होते. स्त्रीमुक्ती परिषदेसाठी सभास्थळी भव्य ‘बॅकड्रॉप’ उभारण्यात आला होता. दोन दिवसांपासून व्यासपीठ उभारणीचे काम सुरू होते. असे असताना प्रकाश आंबेडकर यांचे व्यासपीठावर आगमन होण्यापूर्वीच ‘बॅकड्राप’ काही भाग लोखंडी अँगलसह कोसळला. त्यामुळे काही वेळेसाठी तारांबळ उडाली.

सुजात आंबेडकर हे तातडीने व्यासपीठाजवळ आलेत व त्यांनी कोसळलेल्या ‘बॅकड्रॉप’ बाबत माहिती घेतली. सुजात यांनी कार्यकर्त्यांना मदत करीत कोसळलेले साहित्य बाजूला केले. अपघाताने घडलेला हा प्रसंग वगळला तर 'वंचित'ची नागपुरात स्त्रीमुक्ती परिषद प्रचंड यशस्वी ठरली. या परिषदेसाठी राज्यभरातून महिला, युवती उपस्थित होत्या. स्त्रीमुक्ती व मनुस्मृतीबाबत फलक हाती घेतलेल्या बालिकांनीही सभास्थळी उपस्थितांचे लक्ष वेधले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्त्रीमुक्ती परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय व भाजपचा गड असलेल्या नागपुरात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात प्रकाश आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीला यश आले. लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडी राज्यात महाविकास आघाडीत व केंद्रात ‘इंडिया’ आघाडीत समावेश व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपला अहंकार बाजूला ठेवत ‘वंचित’ला सोबत घ्यावे असे आवाहनही पक्षाकडून करण्यात आले होते.

संघ आणि भाजपच्या विचारसरणी विरोधात लढणाऱ्या पक्षांनी एकत्र यावे व भाजपचा मार्ग रोखावा यासाठी हा प्रयत्न असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते. अशात आघाडीबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी आपला मार्ग मोकळा असेल असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते. सध्या 'वंचित'ला महाराष्ट्रात शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची साथ मिळत आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT