Balasaheb Thackeray Sarkarnama
विदर्भ

Balasaheb Thackeray : कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याला बाळासाहेब नक्षलवादी म्हणायचे, पण का ?

संदीप रायपूरे

हिंदूहृदयसम्राट, शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीच्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे अनेक विषय आज समोर येत आहेत. सध्या राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले विजय वडेट्टीवार हे कधीकाळी कट्टर शिवसैनिक होते. मुंबईत ‘माहौल’ करणाऱ्या शिवसेनेला वडेट्टीवारांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या टोकापर्यंत पोहोचवले होते.

विजय वडेट्टीवार यांच्या या कार्याची विशेष दखल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. विजय वडेट्टीवार यांना बाळासाहेब ठाकरे नक्षलवादी म्हणून आवाज मारायचे. अर्थात, ते गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात पक्षाचे काम करीत होत. या उद्देशाने प्रेमानेच ते वडेट्टीवारांचा नक्षलवादी असा उल्लेख करायचे. विजय वडेट्टीवार यांनी मागील काळात दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

त्यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले होते की, बाळासाहेब मला प्रेमाने नक्षलवादी म्हणून आवाज मारायचे. ‘अरे नक्षलवादी इकडे ये...,’ असेही म्हणायचे. त्यांनीच माझ्या कार्याची दखल घेतली. गडचिरोली जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा आहे. येथील विधानसभा, लोकसभेच्या जागा आदिवासींसाठी राखीव होत्या. अशा वेळी 1995 मध्ये त्यांनी मला राज्यमंत्री दर्जाचे असलेले वनविकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले होते.

एवढेच नाही, तर पुढे 1998 मध्ये त्यांनी आपणाला विधान परिषदेचे आमदारपद दिले. त्या काळात शिवसेनेकडून फक्त मुंबईतील नेते विधान परिषदेवर घेतले जात होते. पण मुंबई वगळता विधान परिषदेवर जाणारा संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रातून मी केवळ एकटाच होतो, असेही वडेट्टीवारांनी त्या मुलाखतीत सांगितले होते. चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावात जन्मलेले विजय वडेट्टीवार यांचे जीवन संघर्षमयच राहिले आहे.

वडेट्टीवार यांचे वडील नामदेवराव वडेट्टीवार हे करंजी गावाचे सरपंच होते. पण त्यांचे निधन झाले अन् विजय वडेट्टीवार यांना गाव सोडावे लागले. मग त्यांच्या कुटुंबीयांनी गडचिरोली गाठली अन् ते तेथेच स्थिरावले. सुरुवातीला काँग्रेसच्या एनएसयुआयपासून राजकारणाची सुरुवात करणारे विजय वडेट्टीवार यांनी मग बाळासाहेबाच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेचे काम सुरू केले.

शिवसेनेत आल्यानंतर वडेट्टीवारांनी मागे वळून बघितले नाही. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील गावागावांत त्यांनी शिवसेना पोहोचविली. बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा, यासाठी आपल्या स्कूटरने जिल्हा पिंजून काढला होता. या काळात त्यांना नक्षलवादी घेऊन गेले होते. पण यातूनही त्यांनी कशीबशी सुटका करून घेतली होती. पक्षासाठी नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या गडचिरोलीत आपल्या पक्षाचा एक तरुण कार्यकर्ता दिवस-रात्र एक करीत आहे, याची माहिती मातोश्रीवर पोहोचली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाळासाहेबांनी तातडीने या तरुणाची दखल घेतली. वडेट्टीवारांना थेट मातोश्रीवर बोलाविण्यात आले अन् यानंतर विजय वडेट्टीवार यांची लॉटरीच लागली. त्यांना आधी वनविकास महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले अन् यानंतर त्यांना विधान परिषदेचे आमदार बनविण्यात आले. आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या विविध आठवणींना उजाळा देण्यात आला. या विषयावरून मागील काळात विजय वडेट्टीवार यांनी मुलाखत दिली होती. यात त्यांनी बाळासाहेब आपणास नक्षलवादी म्हणून आवाज द्यायचे, असे सांगितले होते.

Edited By : Atul Mehere

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT