Balasaheb Thackeray's staunch fan Sarkarnama
विदर्भ

Balasaheb Thackeray : ‘तो’ शिवसैनिक नाही, पण बाळासाहेबांचा कट्टर चाहता; दर्शन घेऊनच करतो दिवसाची सुरुवात !

Shivsena : चहाचे कॅन्टीन चालवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह सुर्वे चालवतात.

जयेश विनायकराव गावंडे

Akola Political News : हिंदूत्वाची पताका खांद्यावर घेऊन असंख्य वादळांना सामोरे जाणारे शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चाहत्यांची कमी नाही. लाखोंच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बाळासाहेबांचा असाच एक चहावाला कट्टर चाहता म्हणून प्रसिद्ध आहे. हा चहावाला शिवसेनेचा कोणता पदाधिकारी तर सोडाच, शिवसैनिकही नाही. मात्र आपल्या व्यवसायाची सुरुवात बाळासाहेबांच्या दर्शनाने 'तो' करतो.

मुरलीधर सुर्वे त्यांचं नाव. अकोल्यातील नेहरू पार्क परिसरात त्यांची चहाची छोटीशी कॅन्टीन आहे. कॅन्टीनमध्ये सर्वत्र बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावले आहेत. असा हा बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर चाहता चहावाला अकोल्यात चर्चेचा विषय आहे. आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी आणि तळपत्या वक्तृत्वशैलीने संपूर्ण महाराष्ट्राला स्वाभिमानाने उभे राहण्याचा मंत्र देणारं वादळी व्यक्तिमत्त्व म्हणजे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा चाहतावर्ग राज्याच्या कानाकोपऱ्यात आहे.

शिवसैनिक नसूनही बाळासाहेबांबद्दल प्रत्येकाच्या मनात एक आदर आहे. हाच आदर कायम जपलाय एका चहावाल्याने. हा चहावाला आजही स्वतःला बाळासाहेबांचा कट्टर चाहता समर्थक मानतो. अकोल्यातील नेहरू पार्क परिसरातील मूर्तिजापूर रोडवर मुरलीधर माधवराव सुर्वे यांची चहाची कॅन्टीन आहे. हा चहावाला बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे आणि विचारांनी प्रेरित झालेला आहे. सुर्वे हे शिवसेनेचे पदाधिकारी अथवा कार्यकर्ते नसूनही आपल्या चहाच्या दुकानाची सुरुवात बाळासाहेबांच्या पूजेने करतात.

चहाचे कॅन्टीन चालवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह सुर्वे चालवतात. दररोज सकाळी आपल्या कँटीनमध्ये येऊन बाळासाहेबांची पूजा केल्याशिवाय ते कामाची सुरुवात करीत नाहीत. ते बाळासाहेबांना देव मानतात. गळ्यातील लॉकेटमध्ये बाळासाहेबांचा फोटो आहे. इतकंच नाही तर नजर जाईल तिकडे बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो त्यांनी लावलेले आहेत. हातात शिवबंधन आणि त्यांच्या कपाळाला भगवा टिळा, गळ्यात भगवा दुपट्टा कायम असतो, तर दुकानात काम करणाऱ्या प्रत्येक मजुराच्या अंगावर एकाच कलरच्या टी-शर्टवर बाळासाहेबांचा फोटो, तर सुर्वे यांच्या गळ्यात तीन ते चार रुद्राक्षमाळा आहेत.

बाळासाहेब ठाकरेंमुळेच प्रसिद्धी..

प्रत्यक्ष सत्तेत नसतानाही महाराष्ट्राच्या राजकारणावर चार दशकांहूनही अधिक काळ स्वत:ची अधिसत्ता बाळासाहेब ठाकरे यांनी प्रस्थापित केली. आज बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आपला व्यवसाय जोरात असल्याचे मुरलीधर सुर्वे सांगतात. चहाच्या माध्यमातून आपण महिन्याला लाख रुपये कमावतो. हा व्यवसाय केवळ साहेबांमुळेच प्रगतीवर असल्याचे सुर्वे सांगतात.

अकोल्यात 'मुरली चहा'बद्दल कुणाला माहिती नसेल असं होऊ शकत नाही. बरं... या चहाची चवही अगदी कडक आहे. सुर्वे यांनी 1997 पासून 'मुरली चहा'चं कॅन्टीन सुरू केले. चहा विकून वर्षाला लाखोंची उलाढाल सुर्वे करतात. तसेच, त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. या चहाला चॉकलेटचा फ्लेवर असतो. असा हा अनोखा चहावाला सध्या चांगलाच प्रसिद्ध झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनाफुटीनंतर सुर्वे अस्वस्थ...

शिवसेनेत फूट पडल्यापासून मन अस्वस्थ होऊन गेल्याचे सुर्वे सांगतात. कारण बाळासाहेबांनी मोठ्या कष्टाने शिवसेना उभी केली होती. आज त्याच शिवसेनेला तडा गेला आहे. मात्र एक कट्टर चाहता म्हणून मी आजही बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या परिवारासोबत असल्याचे सुर्वे सांगतात. आम्ही कायम एकनिष्ठच राहणार आहे. कारण बाळासाहेब ठाकरे ही एक विचारधारा आहे. ते मनातून कधीही जाणार नाहीत आणि कधीच संपणार नाहीत.

आदित्य ठाकरेंनी दिली होती भेट...

शिवसेनाफुटीनंतर आदित्य ठाकरे हे अकोल्यात सभा घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी या चहावाल्याबद्दल माहिती घेऊन सुर्वे यांच्या कॅन्टीनला भेट दिली होती आणि आदित्य ठाकरे यांनी मुरली चहाच्या निष्ठेचे कौतुक केले होते.

Edited By : Atul Mehere

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT