Nagpur News : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सर्वच पक्षांत सध्या लगीनघाई सुरु आहे. महायुती व महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे निवडणुकीची तयारी जोरात सुरु असताना महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून जोर लावला जात आहे. त्यावर बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मोठं विधान केलं आहे.
आमच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार नाही हे आधीच स्पष्ट केले आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत. त्यानंतर मुख्यमंत्री कोणाला करायचे हे ठरवण्यात येणार आहे.
संजय राऊत यांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव घेतले आहे. प्रत्येक पक्ष आपआपल्या नेत्याला प्रोजेक्ट करीत असतो. त्यात वावगे काही नाही. काँग्रेसचे कार्यकर्ते कोणाचे नाव घेत असतील तर कोणी वाईट वाटून घ्यायचे कारण नाही, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी शिवसैनिकांना दिला.
महाविकास आघाडीत सध्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांवर चर्चा झडत आहे. ठाकरे सेनेने उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील, असे आधीच जाहीर केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही त्यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, असे आवाहन केले आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यावर मौन बाळगले आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी यांनी आम्ही कोणालाही मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
बाळासाहेब थोरात यांनीसुद्धा यावर गुरुवारी भाष्य केले. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असे वाटत असते. त्या भावनेतून तो बोलत असतो. आमचे कार्यकर्तेसुद्धा अनेकांची नावे घेतात. त्यामुळे इतरांना वाईट वाटून घेण्याची गरज नाही, असा सल्ला त्यांनी महाविकास आघाडीतील घटकपक्षांना दिला आहे.
महाविकास आघाडीचे जागावाटपाचे अद्याप निश्चित झाले नाही. परंतु, आमच्या दोन संयुक्त बैठका या संदर्भात झाल्या आहेत. आम्ही एकत्रितपणेच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. महाराष्ट्रात लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीतही आम्हाला मोठे यश लाभणार आहे. हे निश्चित असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीला मिळणारा प्रतिसाद पाहून भाजप व महायुतीचे सरकार घाबरले आहे. त्यांना पराभवाची भीती सतावत आहे. त्यामुळे निवडणुका पुढे कशा ढकलायच्या याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या महायुती सरकारचा गेल्या काही दिवसापासून सरकारी खर्चातून जोरदार प्रचार सुरू असल्याचेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.