Ballapur Police Station
Ballapur Police Station sarkarnama
विदर्भ

BJP : 'नेत्यांचे वाढदिवस आता पोलिस ठाण्यात' ; भाजपचे नेते ठरले पहिले मानकरी

प्रमोद काकडे : सरकारनामा ब्युरो

चंद्रपूर : पोलिस ठाण्यात एरवी तक्रारींची नोंद, गुन्ह्यांचा तपास आदी कामे केली जातात, असा सर्वसाधारण आजवरचा समज. परंतु बल्लापुरचे ठाणेदार (Ballapur Police Station) उमेश पाटील यांनी हा समज खोटा ठरविला. (Ballapur Police Station latest news)

ठाण्यातील दैनंदिन कामांच्या व्याप सांभाळून त्यांनी एक नवा अभिनव उपक्रम सुरु केला. त्याचे अद्याप नामकरण झाले नाही. मात्र विरोधक या उपक्रमाला 'नेत्यांचे वाढदिवस आता पोलिस ठाण्यात' या नावाने गौरवित आहे. या अभियानाचे पहिले मानकरी बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे (bjp)ग्रामीण जिल्ह्याध्यक्ष हरीश शर्मा ठरले.

एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंगात भाजपचा ४५ वर्षीय शहर सचिव संजय वाजपेयी गजाआड आहे. ही कारवाई बल्लारपूरचे ठाणेदार उमेश पाटील यांनीच केली. तत्पूर्वी भाजपच्या काही नेत्यांनी पिडीतेच्या कुटुंबीयाला समजाविण्याचा प्रयत्न केला होता.

पाटील जेवढे मृदू तेवढेच कठोर सुद्धा. पिडीतेच्या परिसरातील नागरिकांनी ठाण्याला घेराव घातला आणि आपणच ठाणेदार असल्याची जाणीव पाटील यांनी झाली. त्या सचिवावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.

ही कामगिरी पार पाडण्यापूर्वी ठाणेदार पाटील यांचे प्रिय मित्र, बल्लापूरचे माजी नगराध्यक्ष हरिश शर्मा यांचा वाढदिवस आला. ठाणेदारांना क्षणाचीही फुरसत नव्हती. चोवीस तासात कामात. अलिकडे केंद्र आणि राज्य दोन्हींचे नेतृ्त्व १८-१८ तास काम करतात. त्यांच्यापासून पाटील यांनी प्रेरणा घेतली असावी.

त्यामुळे ठाणे न सोडताच शर्मांला त्यांनी ठाण्यात बोलविले. शर्मांचा वाढदिवस असताना ठाण्यातून बोलविणे आल्याने कार्यकर्ते चिंतेत पडले. शेवटी आपली सत्ता आहे. बघून घेवून म्हणून ते आपल्या फौजफाट्यासह ठाण्यात दाखल झाले. तेव्हा समोरचे दृश्य बघून शर्मा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे डोळेच पाणावले. पाटील यांनी आधीच त्यांच्यासाठी केक आणि मॅजिक कॅन्डल आणून ठेवले होते. आपल्याच कक्षात टेबलवर त्यांनी केक ठेवला.

शर्मांच्या हातानी कापला. दोघांनीही एकमेकांना केकचे तुकडे प्रेमाने भरविले. मॅजिक कॅन्डल पेटवून ठाण्यात 'उजेड' पाडला. या नेत्रदीपक सोहळ्यातला ठाण्यातील सर्व पोलिसांना आवर्जून उपस्थित ठेवण्यात आले होते. त्यांनीही मोठ्या आनंदाने 'हॅपी बर्थडे हरिश भैय्या' असा कोरस ठाणेदारांच्या साथीने दिला.

पोलिसांनी उरलेले केकेच तुकडे तोंडात घातले आणि आपआपल्या जागी तैनात झाले. काही उत्साही कार्यकर्त्यांनी या रामभरत भेटीचे भ्रमणध्वनीवर चित्रिकरण केले. समाज माध्यमात सध्या ही चित्रफित जोरात व्हायरल होत आहे.

ठाणेदार पाटील यांनी सुरु केलेला 'नेत्यांचे वाढदिवस पोलिस ठाण्यात' हा उपक्रम सर्वच ठाण्यात राबवावा, अशी मागणीच समाज माध्यमातून होत आहे. जिल्हा पोलिस अधिक्षकांचे कार्यालय सुद्धा यातून सुटु नये, असा उल्लेख आवर्जून नेटकरी करतात. यामुळे आता विरोधक मात्र जाम खुश झाले आहे.

सत्ता गेल्यामुळे ठाण्यात बसायला साधी खुर्ची मिळत नाही, अशा कॉग्रेस नेत्यांनाही या निमित्ताने थोडासा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता बल्लारपूर शहरातील सर्वच विरोधी पक्षाने एकत्र यावे. आपल्या नेत्यांच्या वाढदिवसांची यादी तयार करुन ठाणेदार पाटील यांनी द्यावी, यावर बहुतेकांचे एकमत झाले आहे.

वाटल्यास केक आम्ही आणतो. परंतु वाढदिवस ठाणेदार साहेबांनीच साजरा करावा, अशी एकमुखी मागणी बल्लारपुरातील समस्त विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून होत आहे. दुसरीकडे शर्मांचा ठाण्यात भव्यदिव्य वाढदिवस साजरा केल्यानंतर पाटील यांना कोणते 'रिटर्न गिफ्ट' मिळेल, यावर आता 'बेटींग' सुरु झाल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT