Balu Dhanorkar Sarkarnama
विदर्भ

Balu Dhanorkar : तेव्हा महापालिका, नगर पंचायती अन् बाजार समित्याही नव्हत्या, तरीही खासदार झालोच ना..!

Chandrapur : बाजार समितीची निवडणूक म्हणजे काही लोकसभेची निवडणूक नाही.

सरकारनामा ब्यूरो

Congress' Chandrapur Mp Balu Dhanorkar News : चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी १२ जागांवर भाजप आणि काँग्रेस समर्थीत शेतकरी सहकार परिवर्तन पॅनलला विजय मिळाला आहे. तर काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या समर्थीत शेतकरी सहकार पॅनलला अवघ्या सहा जागा मिळाल्या आहेत. त्यावरून आगामी निवडणुकांची गणिते मांडणे सुरू झाले आहे. (Calculations for the upcoming elections have started)

या निवडणुकीत खासदार बाळू धानोरकर यांना मोठा धक्का बसला आहे. स्थापनेपासून काँग्रेसकडे असलेली चंद्रपूर बाजार समिती आता काँग्रेसचा एक गट आणि भाजपच्या ताब्यात आली असे सांगण्यात येत आहे. अशा चर्चांना काही अर्थ नाही. कारण बाजार समितीची निवडणूक म्हणजे काही लोकसभेची निवडणूक नाही. ही निवडणूक स्थानिक पातळीवर होते आणि लोकसभेची निवडणूक देशपातळीवरची असते, असे खासदार बाळू धानोरकर म्हणाले.

बाजार समिती म्हणजे लोकसभा किंवा विधानसभा नव्हे. येथे राजकीय पक्षांच्या चिन्हांवर निवडणूक होत नाही, तर स्थानिक आघाड्या तयार होतात. यामध्ये स्थानिक लोकांची राजी-नाराजी महत्वाची असते. पक्ष बघितला जात नाही. या निकालांना पक्षासोबत जोडणे सयुक्तिक नाही. राहिला प्रश्‍न भाजपचा तर जिल्ह्यात भाजप कोणत्याही बाजार समितीमध्ये स्वबळावर सत्तेत आलेली नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांना कॉंग्रेसचाच आधार घ्यावा लागला.

राजुऱ्यामध्ये शेतकरी संघटनेची वर्षानुवर्षांपासून बाजार समितीवर असलेली सत्ता स्थानिक लोकांना उलथवून लावायची होती. त्यामुळे तेथे कॉंग्रेसचे लोक आणि भाजपचे लोक एकत्र आले आणि रणनीती तयार केली आणि शेतकरी संघटनेचा पराभव केला. याचा अर्थ विधानसभा आणि लोकसभेतही कॉंग्रेस आणि भाजप एकत्र राहील का? हे शक्य आहे का, असा सवाल खासदार धानोरकर यांनी केला.

राजुरा, कोरपना, वरोरा, चंद्रपूर या सर्व बाजार समित्यांमध्येही आमचे लोक आहेतच. अर्धे आमचे, तर अर्धे भाजपच्या विचाराचे आहेत. गावातल्या वादांवर तेथे आघाड्या आणि युती होत असते. आज काही लोक जर या निकालांचा संबंध लोकसभेच्या निवडणुकीशी जोडत असतील, तर ते चुकीचे आहे. कारण २०१९मध्ये मी लोकसभेची निवडणूक लढलो, तेव्हा माझ्याकडे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, बाजार समित्या नव्हत्याच. तरीही मी निवडून आलो आणि खासदार झालो.

लोकसभेनंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्येही (Elections) कॉंग्रेसने (Congress) चांगले यश मिळवले. तरीही तुम्ही या निवडणुकांचा संबंध देशपातळीवर होणाऱ्या लोकसभा आणि राज्य (Maharashtra) पातळीवर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांशी जोडणार आहात का, असा सवाल बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी केला. अशा चर्चा करण्याआधी हे लक्षात ठेवावे की बाजार समितीमध्ये भाजप किंवा कॉंग्रेस लढली नाही, तर तेथील स्थानिक पदाधिकारी लढले. त्यांच्या ॲडजेस्टमेंट त्यांनाच माहिती असतात. म्हणून अशा चर्चांना काही अर्थ नाही, असे खासदार बाळू धानोरकर यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT