BJP leader Arun Lakhani after being elected unopposed from the Chandrapur-Wardha-Gadchiroli Local Authorities Constituency, with discussions focusing on Banti Bhangdia’s political strategy. Sarkarnama
विदर्भ

MLC Election : भाजप आमदाराच्या चक्रव्यूहात काँग्रेसचा गेम ओव्हर : वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्यात घुसून बंटी भांगडियांचा धुरळा

MLC Election : चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे अरुण लाखानी बिनविरोध निवडून आले. या विजयामागे आमदार बंटी भांगडिया यांच्या रणनीतीची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

प्रमोद काकडे

MLC Election : राजकारणात नैतिकता आणि अनैतिकतेच्या सीमारेषा अनेकदा धूसर असतात. विजय हेच अंतिम सत्य मानले जाते आणि डावपेचांचे मूल्यमापनही अखेरीस निकालाच्या कसोटीवरच होते. चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत याचीच प्रचिती आली. भाजपचे अरुण लाखानी बिनविरोध निवडून आले. मात्र या विजयामागे चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांची रणनीती आणि राजकीय 'कौशल्य' निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर त्यांनी विरोधकांसह स्वपक्षातील काही नेत्यांवरही गंभीर आरोप केले. भाजपकडून पैशांचा वापर झाल्याचा आरोप त्यांनी केला. या निवडणुकीत पैशाचा प्रभाव होताच, हे नाकारता येणार नाही. मात्र काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि गटबाजी हा पक्षासाठी मोठा अडथळा ठरला. आता अग्रवाल यांच्या माघारीचा नेमका 'अर्थ' काय, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार हे तोडफोडीच्या राजकारणात मातब्बर मानले जातात. २०१८ मध्ये याच मतदारसंघात भाजपकडे संख्याबळ असतानाही त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचविले होते. यावेळी त्यांच्या कन्येचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत होते. त्यामुळे त्यांच्याकडून मोठी राजकीय खेळी अपेक्षित होती. त्यांनी त्यादृष्टीने पाऊलेही टाकायला सुरवात केली. या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फार मोठी तफावत नव्हती. त्यामुळे निवडणूक चुरशीची होईल, असे चित्र सुरवातीला दिसत होते.

मात्र, आमदार बंटी भांगडिया यांनी परिस्थितीचा अचूक अंदाज घेतला. पक्षाने निवडणुकीची सुत्रे त्यांच्याकडे सोपविली. निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी राजकीय हालचाली सुरू केल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक लोकप्रतिनिधींशी संपर्क वाढवून त्यांनी भाजपसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले. विशेष म्हणजे, वडेट्टीवार यांच्या प्रभावक्षेत्रातही त्यांनी घुसखोरी केली. त्यामुळे काँग्रेसची गणिते विस्कळीत होऊ लागली. वडेट्टीवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांच्या बालेकिल्ल्यात घडलेल्या या घडामोडींमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

हे सर्व घडत असताना वडेट्टीवार परिस्थितीवर प्रभावी नियंत्रण का मिळवू शकले नाही, याचीही चर्चा रंगली. दरम्यान, 'तांत्रिक' कारणांमुळे शिवानी वडेट्टीवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर काँग्रेसने उमेदवाराचा शोध सुरू केला. तोपर्यंत काँग्रेसच्या बुरुजाला बऱ्यापैकी भेगा पडल्या होत्या. त्यामुळे उमेदवाराच्या घोड्यावर बसायला कुणी तयार नव्हते. अखेर अग्रवाल यांनी ते धाडस केले. परंतु परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर त्यांचाही धीर सुटला आणि त्यांनी माघार घेतली. ती घ्यायला लावली की घेतली याबाबत वेगवेगळी चर्चा सुरु आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील राजकीय मतभेद सर्वश्रुत आहेत. या अंतर्गत संघर्षाचा फायदा आमदार बंटी भांगडिया यांनी अचूक घेतला. वडेट्टीवारांची कन्या उमेदवार होईल, हे गृहीत धरूनच भांगडियांनी वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात हात टाकला. त्या धक्क्यातून शेवटपर्यंत काँग्रेस सावरू शकली नाही. पैशाने मतदार पळविले, असे आरोप-प्रत्यारोप झाले. काँग्रेसमध्येच संशयाचे वातावरण तयार करण्यात आमदार भांगडिया यशस्वी झाले.

युवा शक्ती संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करणारे बंटी भांगडिया हे एकेकाळी विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. नंतर दोघांचे राजकीय मार्ग वेगळे झाले. त्यानंतर भांगडिया यांनी स्वतःचा स्वतंत्र राजकीय प्रभाव निर्माण केला. चिमूर मतदारसंघातून ते भाजपकडून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे वडेट्टीवार यांना चिमूरऐवजी ब्रह्मपुरी मतदारसंघाकडे वळावे लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात कायम राहिली आहे. यावेळीही वडेट्टीवारांना त्यांनी शह दिला.

गेल्या काही वर्षांत जिल्ह्याच्या राजकारणात भांगडिया यांचे महत्त्व लक्षणीयरीत्या वाढले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शंभर वर्षांच्या इतिहासात प्रथमच भाजपचा अध्यक्ष निवडून आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका मानली जाते. २०१२ मध्ये याच मतदारसंघात बंटी भांगडिया यांनी आपल्या राजकीय चातुर्याची पहिली मोठी झलक दाखवली होती. भाजपकडून त्यांचे वडील मितेश भांगडिया तर काँग्रेसकडून माजी खासदार नरेश पुगलिया यांचे पुत्र राहुल पुगलिया मैदानात होते. संख्याबळ काँग्रेसच्या बाजूने असतानाही भांगडिया यांनी राजकीय गणिते आपल्या बाजूने वळविली आणि मितेश भांगडिया यांना विधान परिषदेवर पाठविण्यात निर्णायक भूमिका बजावली.

विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाले. मात्र चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता काँग्रेस नेत्यांतील आपसी मतभेदांमुळे हातातून गेली. राजकारणात पक्षनिष्ठा, वैचारिक बांधिलकी या निव्वळ अंधश्रद्धा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मुद्रास्त्राच्या लोभाने अनेक निष्ठावंत भाजपच्या गोटात दाखल झाले.

अरुण लाखानी यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजपला मोठे यश मिळाले. मात्र या विजयामागे पडद्यामागून सूत्रे हलविणारे आमदार बंटी भांगडिया यांची रणनिती सर्वाधिक चर्चेत आहे. राजकीय सारीपाटावर योग्य वेळी योग्य चाल खेळत त्यांनी विरोधकांना चित केले आणि पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद सिद्ध केली. त्यात काँग्रेस गाफील राहिली आणि उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की ओढविली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT