Defying BJP's whip, it supported Congress : भारतीय जनता पक्षात सध्या पक्षाच्या सीमा, नियमांपलीकडे जाऊन विस्तार आणि वाढीचा विचार केला जात आहे. इनकमिंग करणाऱ्यांना पायघड्या, तर भाजपमध्ये न येणाऱ्यांसाठी वेगळाच धर्म, भाजपचा हाच फंडा विजयाचा झेंडा फडकविण्याचे काम करत आहे. (Two of the five members had returned home to the BJP)
जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप ताले 'माफिवीर' बनून भाजपमध्ये सामील झाले आहेत. ग्रामीण भागातील राजकीय वर्चस्व अधोरेखित करणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जानेवारी २०२२ मध्ये पार पडल्या. ५२ सदस्यीय भंडारा जिल्हा परिषदेत १० मे २०२२ ला अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली होती.
कमळ चिन्हावर निवडून आलेले भाजपच्या पाच जिल्हा परिषद सदस्यांनी बंडाचा झेंडा उगारत नाना पटोलेंच्या काँग्रेससोबत जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभाग नोंदवत भाजपला कात्रजचा घाट दाखविला होता. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपकडून निवडून आलेले उपाध्यक्ष संदीप ताले व इतर चार सदस्यांनी भाजपच्या व्हिपला झुगारत काँग्रेसला समर्थन दिले होते.
याबाबत भाजपचे जिल्हा परिषद गटनेते विनोद बांते यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे (Collector) तक्रार करत पक्षाशी बंड करणाऱ्या पाचही जिल्हा परिषद सदस्यांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, पाच पैकी दोन सदस्यांनी भाजपमध्ये घरवापसी केली होती. तर उपाध्यक्षासह उरलेल्या दोघांनी परवा परवा भाजपमध्ये घरवापसी केली आहे.
उपाध्यक्ष ताले यांच्याकडून माफीनामा लिहून घेत त्यांना भाजप परिवारात सहभागी करून घेत असल्याचे वक्तव्य भाजप गटनेते विनोद बांते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते. अपात्रतेची टांगती तलवार असल्यामुळेच 'गॉडफादर' चरण वाघमारे यांच्या 'मोटारी'तून उतरून जिल्हा परिषद (ZP) उपाध्यक्ष ताले यांनी 'माफीवीर' बनून घरवापसी केली असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
'सावध ऐका पुढच्या हाका...' या तत्त्वानुसार भाजपने (BJP) पावले टाकण्यास सुरुवात केली असून कधीकाळी भाजपचेच असलेले व सद्यःस्थितीत केसीआरचे गुणगाण गाणाऱ्या वाघमारेंचे पंख छाटण्याचे काम पद्धतशीरपणे भाजपकडून जिल्ह्यात सुरू आहे. संदीप ताले, जि. प. सदस्य ध्रुपता मेहर, उमेश पाटील, बंडू बनकर व दिलीप सार्वे यांच्याकडून पक्षाने माफीनाफा लिहून घेत त्यांची घऱवापसी करून घेतली.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.