Child labor at Bhandara District Sarkarnama
विदर्भ

Bhandara Child abuse : एकीकडे 74 व्या प्रजासत्ताकदिनाचे काही तास उरले, दुसरीकडे चिमुकले बालमजुरीला जुंपले !

अभिजीत घोरमारे

Bhandara : पुलाचे बांधकाम करण्यासाठी एक कंत्राटदार चक्क बालमजुरांचा उपयोग करीत असल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सासरा मिरेगाव येथे उघडकीस आला आहे. एकीकडे 74 व्या प्रजासत्ताकदिनाचे काही तास उरले असताना दुसरीकडे शिक्षणाला मुकून चिमुकले बालमजुरीला जुंपले गेल्याचा विपर्यास पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे चिमुकल्यांचे पालक म्हणून ओळखले जाणारे जिल्हाधिकारी स्वतः या गंभीर प्रकारापासून अनभिज्ञ असल्याने जिल्हा प्रशासन ‘राम’भरोसे चालत असल्याचे समोर आले आहे. ही बालकांवर आलेली परिस्थिती बघता खरंच आपल्याला प्रजासत्ताकदिनाचा 74 वा वर्धापनदिन साजरा करण्याचा अधिकार आहे का, हा प्रश्न खऱ्या अर्थाने उपस्थित झाला आहे.

ही मुले डोक्यावर घमेले, कुदळ, फावडे घेऊन काम करीत आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल शाळेत जाण्याचे सोडून हे चिमुकले इथे काय करीत आहेत? खरे तर ही मुले गरिबीशी दोन हात करत स्वतःच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी मजुरी करीत आहेत. हे चित्र बघून तुम्हाला डिजिटल भारताचे खरे दृश्य दिसून येणार आहे. 16 कोटी रुपये खर्च करून सानगडी- सासरा-मिरेगाव या गावांना जोडण्यासाठी चुलबंद नदीवर पूल बांधण्यात येत आहे.

या बांधकामासाठी खरे तर वयस्कर मजुरांचा वापर करणे कंत्राटदाराला बंधनकारक आहे. मात्र आपली मजुरी वाचावी व लाभ अधिक व्हावा, यासाठी कंत्राटदाराने चक्क बालमजुरांचा वापर सुरू केला आहे. अल्प दरात बालमजूर उपलब्ध होत असल्यामुळे कंत्राटदाराने या बालमजुरांचा वापर सुरू केला आहे. विशेष म्हणजे हे नियमबाह्य कार्य हा कंत्राटदार कोणालाही न घाबरता दिवसाढवळ्या करीत आहे.

उल्लेखनीय असे, की एक अभियंता, कनिष्ठ अभियंता अशा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या देखरेखीत पुलाचे बांधकाम होत आहे. पण या अधिकाऱ्यांना हे बालमजूर दिसले नाही का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आपल्याला याची माहिती नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मात्र रोज तपासणी होत असतानासुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या अधिकाऱ्यांना हे बालमजूर दिसले नाही किंवा त्यांच्या मूकसंमतीने हे बालमजूर काम करीत तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या चिमुकल्यांचे पालक म्हणून जबाबदारी असलेले भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या निदर्शनास ही बालमजुरीची बाब लक्षात आणून दिली असता, आपल्याला हा प्रकार माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. आपण याची माहिती घेऊन दोषींवर कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र पालकरुपी जिल्हाधिकारीच या बालमजुरीच्या प्रकाराशी अनभिज्ञ असेल तर जिल्ह्याचे प्रशासन नक्कीच ‘राम’भरोसे चालत असल्याचे दिसून आले आहे. पण आता जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर ते काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By : Atul Mehere

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT