Shivram Giripunje and Vinayak Burde, Bhandara.
Shivram Giripunje and Vinayak Burde, Bhandara. Sarkarnama
विदर्भ

Bhandara District APMC : सभापती निवडीच्या तारखा ठरल्या, सुरू झाला हाय व्होल्टेज ड्रामा; फोडाफोडीत कोण समोर?

सरकारनामा ब्यूरो

Chairman of Agricultural Produce Market Committee Election : बाजार समितीच्या निवडणुकीचा नेमका अर्थ काय लावायचा, हा सध्या सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरत आहे. या निवडणुकीत बहुतेक सगळे दिग्गज नेते मैदानात उतरलेले दिसले. बाजार समित्यांच्या निवडणुकांना राजकीय महत्त्व आहे. बाजार समित्यांमधील प्रतिनिधी हे तालुक्यातील प्रतिनिधी असतात. तसेच मतदार संघाचेही ते नेते मानले जातात. (Elections to market committees have political significance)

प्रत्येक ग्रामपंचायतीतील सदस्य, विविध कार्यकारी सोसायट्यांतील संचालक या निवडणुकीत मतदान करतात. त्यामुळे या निवडणुकीतून नेत्यांची पत समजते, म्हणूनच बाजार समित्यांच्या निवडणुकांना विधानसभेची रंगीत तालीम म्हटले जाते. त्यामुळे ज्यांना-ज्यांना धडा शिकवायचा आहे आणि ज्यांना धडा घ्यायचा आहे, असे सगळे या निवडणुकीत पूर्ण क्षमतेनं उतरले होते.

जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती ची निवड शनिवारी (ता. २०), भंडारा सोमवारी (ता. २२), लाखांदूर मंगळवार (ता. २३) तर पवनी शुक्रवार (ता. २६) होणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था शुद्धोधन कांबळे भंडारा यांनी ही माहिती दिली.

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊन निकाल हाती आले. नवनिर्वाचित संचालकांचे हारतुरे सुरू असतानाच आता सभापती, उपसभापती पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे इच्छुकांना सभापती-उपसभापतिपदाचे वेध लागले आहेत. त्यासाठी नेत्यांकडे लॉबींगही सुरू झाली आहे. बाजार समिती आपल्या ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांकडून अटोकाट प्रयत्न करण्यात आले.

तब्बल आठ वर्षांनंतर झालेल्या बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणूक निकालानंतर सभापती व उपसभापती पदासाठी आरक्षणामुळे जिल्हा परिषदेत प्रवेश करू न शकलेल्या मात्र बाजार समिती निवडणुकीत संचालक म्हणून निवडून आलेल्यांनी फिल्डिंग लावली असून बाजार समितीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी व निवडून आलेले संचालक सांभाळण्याची त्या-त्या पक्षाच्या नेते मंडळीनाही कसरत करावी लागत आहे.

आगामी निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून बाजार समितीच्या निवडणुकीकडे पाहिले जात होते. त्यामुळे कधी नव्हे ती एवढ्या मोठ्या प्रमाणात बाजार समितीच्या निवडणुकीसाठी चुरस बघावयास मिळाली. या निवडणुकीत सर्वच पक्षांकडून मातब्बर उमेदवारांना उमेदवारी दिली होती. त्यात मात्र आजी, माजी आमदारांनी या निवडणुकीत लक्ष घातल्याने ही निवडणूक अधिकच चुरशीची झाली.

हात उंचावून मतदान की गुप्त मतदान ?

भंडारा बाजार समितीत २२ मे रोजी सभापती व उपसभापतींची निवड होणार आहे. येथील निवडणुकीत १८ पैकी ९ जागा काँग्रेसने जिंकल्या, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप व शिंदे गटाने ६ जागा मिळविल्या. अपक्षांनी ३ जागा बळकावल्या. परंतु तिन्ही अपक्ष राष्ट्रवादी व भाजप समर्थीत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे ९ विरुद्ध ९ असे समीकरण असल्याने बहुमतासाठी दोन्ही गटांना एका मताची गरज आहे.

कुणाचे मत फुटणार व कुणाची सत्ता बसणार, त्यामुळे सर्व १८ संचालक हात उंचावून मतदान करण्याची मागणी करणार का? गुप्त पद्धतीने मतदान करणार हे २२ मे रोजीच ठरणार आहे. निवडणूक हात उंचावून का गुप्त मतदान, याबाबत संचालकांच्या बहुमताच्या मागणीचा विचार करून निर्णय घेतला जाणार आहे. या निवडीकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

लाखनीत गिऱ्हेपुंजे की बुरडे?

लाखनी बाजार समितीसाठी २० मे रोजी सभापती व उपसभापतींची निवड सभेतून होणार आहे. या बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिंदे गटाने १८ पैकी १४ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळविली. कॉंग्रेसने येथे चार जागा जिंकल्या. त्यामुळे येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष व विद्यमान सभापती शिवराम गिऱ्हेपूजे यांची वर्णी लागणार की, नव्या दमाच्या माजी बांधकाम सभापती विनायक बुरडे या राजकारणातील मातब्बर गड्याला सत्ता सोपविणार, हासुद्धा उत्सुकतेचा विषय बनला आहे.

लाखांदूर व पवनी बाजार समितीत काँग्रेसचा डाव कुणावर?

कॉंग्रेसने (Congress) लाखांदूर येथे १८ जागांपैकी ११ जागांवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले. (NCP) राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप (BJP) व शिंदे गटाला केवळ सात जागा मिळाल्या. पवनी बाजार समितीतसुद्धा काँग्रेसने महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांना लोळविले. काँग्रेसने १८ पैकी ११ जागा जिंकून आपणच किंग असल्याचे सिद्ध केले. राष्ट्रवादी, भाजप व शिंदे गटाला फक्त सात जागांवर समाधान मानावे लागले. दोन्ही बाजार समित्यांमध्ये काँग्रेस कुणावर डाव खेळणार, याकडे दोन्ही तालुक्यांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT