Bhandara-Gondia Lok Sabha News : २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे. भाजपचे काम तर बुथस्तरापर्यंत जाऊन पोहोचले आहे. हेवीवेट नेते खासदार राहिलेल्या भंडारा-गोंदिया (Bhandara-Gondia) लोकसभा मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागलेल्या आहेत. कारण २००४ पासून या मतदारसंघाने कुणालाही दुसऱ्यांदा संधी दिलेली नाही.
२००४ ते २००९ भाजपचे शिशुपाल पटले खासदार होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) प्रफुल्ल पटेल यांना पराभूत करून ते निवडून आले होते. २००९ मध्ये शिशुपाल पटलेंला हरवून प्रफुल्ल पटेल खासदार झाले. त्यावेळी नाना पटोले अपक्ष लढले होते. तेव्हा त्यांनी एक लाखाच्या वर मते घेतली होती. २०१४ ते २०१८ नाना पटोले (Nana Patole) भाजपचे खासदार होते, त्यांनी प्रफुल्ल पटेलांना पराभूत केले होते. नानांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे ८ महिन्यांसाठी खासदार झाले होते.
२०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रफुल्ल पटेल लढले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करून भाजपचा राजीनामा दिल्यानंतरही कॉंग्रेसने (Congress) नाना पटोलेंना तिकीट दिले नाही. कारण ती परंपरागत राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी सोडलेली आहे. तरी प्रफुल्ल पटेल इच्छुक नव्हते. मधुकर कुकडे जिल्हाध्यक्ष राहून चुकले होते. ८ महिने मधुकर कुकडे खासदार राहिल्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे सुनील मेंढे विजयी झाले. या मतदारसंघाचा इतिहास बघता सुनील मेंढे यांनी २०२४ मध्ये उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच दिसत, असल्याचे जाणकारांचे मत आहे.
या मतदारसंघात पोवार समाज विरुद्ध कुणबी समाज असा सामना रंगतो. फक्त २०१९ मध्ये कुणबी विरुद्ध कुणबी असा सामना झाला. भंडारा जिल्ह्यात तुमसर, मोहाडी, साकोली, लाखनी हा बावणे कुणबी समाजाचा पट्टा आहे. गोंदियात पोवार समाज मोठा आहे. २०२४मध्ये राष्ट्रवादीने पोवार समाजाच्या उमेदवाराला तिकीट दिले, तर भाजप कुणबी उमेदवार देईल, हे निश्चित आहे. भाजप दर वेळी नवीन चेहरा शोधत असते.
भाजपने उमेदवार बदलण्याची पूर्ण तयारी केल्याचीही चर्चा आहे. यामध्ये माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले, माजी राज्यमंत्री महादेव शिवणकर यांचा मुलगा विजय शिवणकर, गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले, बावणे कुणबी उमेदवार द्यायचा झाल्यास विनोद बांते अशी नावे चर्चेत आहेत. परिणय फुके येथूनच विधान परिषद सदस्य होते. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांत त्यांचा जनसंपर्क आहे. २०१९ च्या निवडणुकीतही मेंढे यांच्या विजयात त्यांचा वाटा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे २०२४ मध्ये डॉ. फुके यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. असे न झाल्यास विजय शिवणकर यांचा नंबर लागू शकतो.
स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुकीत काहीही झाले तरी लोकसभेची निवडणूक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मिळूनच लढतात. भंडारा-गोंदिया मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडलेला आहे. त्यामुळे येथे प्रफुल्ल पटेल ठरवतील उमेदवार असणार आहे. कारण ते स्वतः लढण्यास इच्छुक नाहीत. अशावेळी ते पत्नी वर्षाबेन पटेल, भंडारा जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे किंवा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे यांना समोर करू शकतात. अपक्ष आणि इतर लहान पक्षांमध्ये येथे लढण्याची ताकत नाही. त्यामुळे लढत ही भाजप आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्येच होणार, हे निश्चित.
या मतदार संघात शिवसेनेची फार मोठी ताकद नाही. शिवसेनेच्या फुटीनंतर तर त्यातही दोन गट पडले आहेत. त्यामुळे भंडारा-गोंदियामध्ये ठाकरेंचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडणार नाही, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी असली तरीही काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपमध्येच मुख्य लढत असेल.
नाना पटोलेंची भूमिका महत्वाची...
भंडारा-गोंदियाचे खासदार राहिलेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातून विस्तवही जात नाही. येथे नानांनी एकदा पटेलांना पराभूत केलेले आहे. पटेल निवडून येऊ नये, म्हणून नाना पूर्ण जोर लावणार, हे निश्चित. त्यामुळे नाना पटोलेंची भूमिका या निवडणुकीत महत्वाची राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.