Bhandara District Political News : चार ऑक्टोबरला राज्याच्या १२ जिल्ह्यांतील नवीन पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या. त्यात भंडारा जिल्ह्याचादेखील समावेश आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चार्ज काढून आदिवासी विकासमंत्री विजय गावित यांना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले गेले आहे. (Vijay Gavit has been given the post of Guardian Minister of Bhandara district)
पण आज नऊ दिवस होऊनही विजय गावित यांना भंडाऱ्याचा रस्ता दिसला नाही. बाहेरचा पालकमंत्री आम्हाला नको, अशी मागणी भंडाराकरांनी खूप आधीपासून केलेली आहे, पण त्यांच्या नशिबी स्थानिक पालकमंत्री नाही, असंच दिसतंय. गावितांना पालकमंत्री होऊन नऊ दिवस झाले तरी त्यांनी अद्याप भंडारा प्रशासन पर्यायाने जिल्हावासीयांना दर्शन दिले नाही. प्रशासनाला त्यांनी साधा कॉलही अद्याप केलेला नाही.
गावितांवर भंडाऱ्याचे पालकत्व लादले गेले आहे. त्यामुळे त्यांनी अद्याप इकडचा रस्ता धरला नाही, असे नागरिक बोलू लागले आहेत. सत्तापक्षाने आजवर भंडारा जिल्ह्यावर सातत्याने अन्याय केला आहे. आजवर जिल्ह्याला नेहमी बाहेरचा पालकमंत्री थोपवला गेला आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये गावितांचा रूपाने ही परंपरा कायम राहिली आहे. माजी मंत्री बंडू सावरबांधे यांच्याव्यतिरिक्त आजवर भंडारा जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळालेला नाही.
पालकमंत्र्यांच्या बाबतीत भंडाराकरांचे नशीबच खराब आहे. पालकमंत्री गावित जिल्ह्याला वेळ देतील, त्यांच्याकडून विशेष लक्ष दिले जाईल, असा विश्वास मात्र भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनी जिल्हावासीयांना दिला होता, पण मेंढेंच्या विश्वासावर विजय गावित खरे उतरले नाहीत.
नव्या पालकमंत्र्यांकडून जिल्हा प्रशासनाला अद्याप कॉलही आला नसल्याची माहिती काही अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर मिळाली. बरीचशी कामे प्रलंबित आहेत. पालकमंत्र्यांना आढावा घेतल्याशिवाय जिल्ह्यातील कामे मार्गी लागणार नाहीत. भंडारा जिल्ह्यातील नागरिक पालकमंत्री नाहीत म्हणून ओरड करत आहेत. गावितांसाठी भंडारा जिल्हा जर ‘जबरदस्तीचा राम राम’ असेल तर आताही मुख्यमंत्र्यांनी त्यांना बदलवून दुसरा पालकमंत्री द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
पालकमंत्र्याच्या बाबतीत भंडारा जिल्हा कमनशिबी राहिला आहे. खासदार मेंढे यांनी विश्वास व्यक्त केल्यानंतर विजय गावितांकडून जिल्हावासीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या, पण त्यांनी जिल्हावासीयांचा अपेक्षाभंग केला. आज जिल्हा ज्या स्थितीत आहे, त्या स्थितीत नव्या पालकमंत्र्यांना येथे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे लवकर येऊन जिल्ह्याचा चार्ज घ्यावा आणि कामे मार्गी लावण्याची गरज आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.