Bhandara District Political News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. वरिष्ठ पातळीवर उमेदवाराची चाचपणीही सुरू झाली आहे. कोणता उमेदवार दिला तर विजय सहज मिळेल, याची परीक्षा सुरू आहे. दरम्यान, मागील निवडणुकीत आपल्याला मदत करणाऱ्या स्थानिक संघटनांचीही पुन्हा मदत कशी घेता येईल, हेदेखील तपासले जात आहे. (MLA Bhondekar forgot his promise to an organization)
अशा परिस्थितीत भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर हेही आतापासूनच निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. दरम्यान, आपल्याला मागील निवडणुकीत मदत करणाऱ्या एका संघटनेला दिलेल्या वचनाचा आमदार भोंडेकरांना विसर पडला. कार्यकाळ संपत आला तरी भोंडेकरांनी आपला शब्द न पाळल्याने ही संघटना कमालीची नाराज झाली आहे.
येत्या निवडणुकीत आमदार भोंडेकरांना मदत न करण्याचा निर्णय या संघटनेने घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे या नाराजी नाट्याचा परिणाम भोंडेकरांना आगामी निवडणुकीत त्रासदायक ठरणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार भोंडेकर यांनी २०१९च्या निवडणुकीत शिवसेनेशी फारकत घेत ‘ट्रॅक्टर’ चिन्हावर अपक्ष निवडणूक लढविली होती. या वेळी त्यांनी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाची मदत घेतली होती.
मदतीच्या बदल्यात भोंडेकरांना भंडारा जिल्हा प्रहारला एक रुग्णवाहिका देण्याचे वचन दिले होते. प्रहार संघटनेचे मूळ आरोग्य सेवा असल्याने एका रुग्णवाहिकेच्या ‘कमिटमेंट’वर अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या भोंडेकरांना मदत करण्याचे ठरले. तत्कालीन जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी यांनीही जिवाचे रान करत भोंडेकरांना त्यावेळी १५ ते २० हजार मते मिळवून दिली होती, असे प्रहार संघटनेकडून सांगण्यात आले.
कबूल केल्यावरही रुग्णवाहिका देण्याचे वचन आता कार्यकाळ संपत आला तरी भोंडेकरांचा लक्षात राहिले नाही. किंबहुना भोंडेकरांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप भंडारा प्रहारचे माजी जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी यांनी केला आहे. दरम्यान, आता भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघात प्रहारने आपली ताकद वाढविली आहे. स्वतः निवडणूक लढवल्यास ३० हजारच्या वर मतदान मिळण्याचा विश्वास वंजारी यांना आहे. त्यामुळे नाराज प्रहार कार्यकर्त्यांनी भोंडेकरांच्या वचन भंगाचा बदला घेण्याची तयारी सुरू करून आमदार भोंडेकरांना इशारा दिला आहे.
दुसरीकडे येणारी विधानसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याचे बोलले जात आहे. भाजप पक्षश्रेष्ठींकडून तसे ‘कामाला लागा’च्या सूचनाही भाजप कार्यकर्त्यांना दिल्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीत भाजप भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवार उभा करणार आहे. दुसरीकडे काँग्रेसही आपला उमेदवार शोधत आहे. बीआरएसच्या चरण वाघमारे यांनी आधीच या मतदारसंघात ‘शेड्यूल कास्ट’ला उमेदवारी देणार असल्याचे घोषित केले आहे.
ठाकरे गटही या विधानसभा क्षेत्रात आपला तगडा उमेदवार देत २०२४ च्या निवडणुकीत भोंडेकरांना शह देण्यास तयार झाला आहे. हे सर्व राजकीय समीकरण बघता भोंडेकरांचे टेन्शन वाढणे साहजिक आहे. आता त्यात भोंडेकरांची मित्र संघटना प्रहारनेही वचनभंगाचे कारण देत फारकत घेतल्याने आमदार भोंडेकर यांच्यासाठी आगामी निवडणूक अवघड जाणार, असे बोलले जात आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.