Prakash Balbuddhe with Chandrashekhar Bawankule. Sarkarnama
विदर्भ

Bhandara News : नव्या नियुक्तीनंतर भंडारा जिल्हा भाजपमध्ये ‘प्रकाश’पर्व येणार?

सरकारनामा ब्यूरो

BJP had to face defeat : जगातील सर्वात मोठा व शिस्तबद्ध पक्ष असलेल्या भाजपचे सध्या अच्छे दिन सुरू आहेत. २०१४ च्या पंचवार्षिक निवडणुकीत जिल्ह्यात खासदारांसह तिन्ही आमदार भाजपचे होते. मात्र, जिल्हा भाजपची संघटनात्मक बांधणी बिघडल्याने सन २०१९ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेच्या जागेवर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. (At one time, BJP was considered as a small party)

त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतदेखील भाजपला यश संपादन करता आले नसल्याने जिल्ह्यात भाजपला वाईट दिवसांचा सामना करावा लागला. अशातच प्रदेश भाजपकडून जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर प्रकाश बाळबुद्धे यांची वर्णी लागली आहे. बाळबुद्धेंच्या नेतृत्वात अंधारलेल्या जिल्हा भाजपमध्ये “प्रकाश” पडणार का, याची उत्सुकता भाजप कार्यकर्त्यांना लागली आहे.

कधी काळी छोटा पक्ष म्हणून भाजपला हिणवले जात होते. केवळ दोन खासदार असलेला पक्ष आज देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. सन २०१४ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि राज्यातदेखील भाजपला घवघवीत यश मिळाले. जिल्हा भाजपचे सूत्र तत्कालीन खासदार व विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व तत्कालीन जिल्हाध्यक्ष मो. तारीफ कुरेशी यांच्याकडे होते.

भंडारा, साकोली व तुमसर अशा तिन्ही विधानसभांवर भाजपला यश मिळाले होते. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत यश संपादन करता आले नाही. तर विधानपरिषद निवडणुकीत भाजपला यश मिळाले. जिल्ह्याच्या राजकारणात नागपूर मनपाचे तत्कालीन नगरसेवक डॉ. परिणय फुके यांची आमदार म्हणून एंट्री झाली. पुढे चालून विद्यमान जिल्हा अध्यक्ष तारीफ कुरेशी यांना म्हाडाचे सभापती पद मिळाले. मंत्री पदाची आस लाऊन बसलेल्या नाना पटोलेंनी खासदारकीचा राजीनामा दिला.

दरम्यान याच काळात भाजप जिल्हाध्यक्ष पदावर तुमसरचे प्रदीप पडोळे यांची वर्णी लागली. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला व खासदार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मधुकर कुकडे विजयी झाले. त्यानंतर जिल्ह्यातील भाजपचे वर्चस्व कमी होऊ नये म्हणून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात डाँ. परिणय फुके यांना राज्यमंत्री पद मिळाले अन् जिल्ह्यातील आमदारांच्या तुलनेत फुकेंचे जिल्ह्यात वलय वाढले.

त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भंडाऱ्याचे तत्कालीन नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी मिळाली. दुसऱ्यांदा चाललेल्या मोदी लाटेत तेदेखील विजयी झाले. सर्व आलबेल असताना सन २०१९ च्या निवडणुकीत विद्यमान तिन्ही आमदारांच्या तिकीट कापण्यात आल्या व नवख्यांना उमेदवारी देण्यात आली आणि तिन्ही जागांवर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. जिल्हा भाजप अध्यक्ष पदाची माळ शिवराम गिऱ्हेपुंजे यांच्या गळ्यात पडली.

पदवीधर मतदार संघ, शिक्षक मतदार संघ, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या. मात्र, यात भाजपला पाहिजे तसे यश संपादन करता आले नाही. जिल्ह्यात दिवसेंदिवस भाजपला वाईट प्रसंगांचा सामना करावा लागत होता. राज्यात महाविकास आघाडीची सरकार कोसळून शिंदे - फडणवीस सरकार उदयास आले. मात्र, भाजप कार्यकर्त्यांना कधी अच्छे दिन पाहायला मिळाले नाही.

दरम्यान जिल्हा अध्यक्ष व भाजपच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांमुळेच जिल्हा भाजपची अशी गत झाल्याचे बोलले जाऊ लागल्याने जिल्हा अध्यक्ष बदलाचे वारे वर्षभरापासून वाहू लागले होते. जिल्हा अध्यक्ष पदाच्या शर्यतीत अनेकांची नावे चर्चेत होती. त्यात साकोलीचे माजी आमदार बाळा काशीवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष लाखांदुरचे अॅड. वसंत एंचिलवार, प्रकाश बाळबुद्धे, संजय कुंभलकर यांचा समावेश होता.

सन २०२४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुका (Elections) लक्षात घेता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी १८ जुलै २०२३ रोजी नवीन जिल्हा अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. अन् प्रकाश बाळबुद्धे हे जिल्हा भाजपचे (BJP) नवे अध्यक्ष झाले. बाळबुद्धे यांनी प्रशासकीय सेवेत काम केले असून, ते उच्चशिक्षित आहेत. राज्यातील दिग्गज नेत्यांशी त्यांची जवळीक आहे. त्यामुळे बाळबुद्धेंच्या नेतृत्वात अंधारलेल्या जिल्हा भाजपमध्ये ‘प्रकाश’ पडणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT