Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Bhandara Politics : राजीनामा सत्रानंतर पटोलेंच्या गृहजिल्ह्यात सारेच `कीप क्वाईट’ !

Nana Patole : भंडाऱ्यातील स्थानिक नेत्यांच्या हालचालीवर वॉच ठेवला जात आहे.

अभिजीत घोरमारे

Bhandara Politics : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपवासी झाले, या बातमीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडारा जिल्ह्यात सारेच कीप क्वाईट झाले आहेत. भंडारा जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते उघडपणे राजीनामा सत्रावर बोलण्यास नकार देत आहेत. किंबहुना या राजीनामा सत्राच्या ‘चर्चा’सत्रात स्वतःला अंतर्भूत करण्यास टाळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अशोक चव्हाणांनी मोठा धक्का दिला, असे सर्वांनाच वाटत असताना आता त्याची कारणमिमांसाही येथे जो तो आपआपल्या परीने करायला लागला आहे. या सर्व घडामोडींत अशोक चव्हाणांच्या पाठीमागे पुन्हा पक्षातील काही नेते भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या पसरत असल्याने आता भंडाऱ्यातील स्थानिक नेत्यांच्या हालचालीवर वॉच ठेवला जात आहे. कुणी नांदेडच्या संपर्कात आहे का, याचीही चाचपणी केली जात असल्याने सध्या येथे संशयाचे वातावरण जाणवत आहे.

नाना पटोले यांचा हा गृहजिल्हा असल्याने त्यांच्यासह पक्षाचे राज्यात पुढे काय होणार, याचीच चर्चा सध्या अधिक आहे. चार दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात मेळावे, भूमिपूजनात गुंतलेल्या पटोलेंनी मंगळवारी सकाळी दिल्लीला उडान भरली आहे. हाय कमांडच्या दरबारात जाऊन महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाच्या धक्क्यांना सावरण्यासाठी प्रयत्न करताना नाना पटोले दिसत आहे. दिल्लीवरून पुन्हा पाहणीसुद्धा सुरू झालेली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या सर्व घडामोडीत आपल्या गृह जिल्ह्यातून कोणीही नांदेडशी संपर्क ठेऊ नये, याचीसुद्धा विशेष काळजी नाना पटोले घेताना दिसत आहेत. स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये स्तब्धता आहे. दुसरीकडे परवा-परवापर्यंत अशोक चव्हाणसुद्धा कॉंग्रेस सोडण्याच्या प्रश्‍नावर नकारार्थी उत्तर देत होते. पण त्यांनी सर्वाना झटका दिलाच.

यातच देवेंद्र फडणवीस यांचे ‘आगे आगे देखो, होता है क्या’, हे विधान आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे ‘यापुढे महाराष्ट्रात भाजपमध्ये मोठमोठे पक्ष प्रवेश झालेले पाहायला मिळतील’, हे विधान या काळात बरेच काही सांगून जाते. भाजपमधील नेत्यांचा बळावलेला आत्मविश्‍वास सध्यातरी असेच काहीसे संकेत देत आहे.

या सर्व घडामोडींत नाना पटोले यांनी भंडारा-गोंदिया काँग्रेसवर त्यातही गोंदिया काँग्रेसवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. या गोंदिया काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष विरुद्ध असलेला एल्गार खूप काही बोलून जात आहे. जिल्हाध्यक्षाच्या मनमानी कारभारावर गोंदिया काँग्रेसचे नेते नाराज आहेत. तेसुद्धा वेगळया भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत, अशा चर्चेला उधाण आलेले आहे.

विशेष म्हणजे आज 14 फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे नेते अमित शहा यांचा मुंबई येथे भाजप कार्यकर्ता मेळावा आहे. या मेळाव्यात भंडारा-गोंदियातील कार्यकर्ते आणि नेते जाऊ नये, याची विशेष काळजी घेणे नानांना गरजेचे आहे. असे असले तरी भंडारा जिल्ह्यात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेला सन्नाटा खूप काही सांगून जात आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT