Bhandara Nagar Parishad Sarkarnama
विदर्भ

Bhandara Soil Smuggling : भंडाऱ्यात 'रात्रीस खेळ चाले'; माजी नगरसेवक लावतोय कोट्यवधी रुपयांचा चुना !

अभिजीत घोरमारे

Bhandara Soil Smuggling : भूमाफियांनी गौण खनिजाची तस्करी करायचे ठरविले, तर ते शासकीय मालमत्तेची कधी वाट लावून टाकतील, याचा नेम नाही. याची प्रचिती भंडारा शहरात आली आहे. नगरपरिषदेच्या हद्दीतील निर्माणाधिन ठिकाणावरून चक्क मातीची तस्करी करत आहेत. विशेष म्हणजे हे तस्कर दुसरे तिसरे कोणी नसून भंडारा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आहेत.

दरम्यान स्वतःच्या पुतण्यामार्फत चक्क मातीची तस्करी करून नगरपरिषदेला कोट्यवधी रुपयाचा चुना लावत आहे. त्यामुळे हा माजी नगरसेवक कोणत्या बड्या नेत्याच्या आशीर्वादाने बेधडकपणे मातीची तस्करी करत 'रात्रीस खेळ' चालवत आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे. भंडारा शहरातील गांधी शाळेच्या पडक्या जागेवर जी केवळ राज्य सरकारने शाळेसाठीच राखीव ठेवलेली आहे. त्या पडक्या शाळेच्या जमिनीवर स्थानिक आमदारांनी आपल्या निधीतून 28 कोटी रुपयांचे सांस्कृतीक भवन निर्माण करण्याचे ठरवले आहे.

या कामासाठी तिरोडाच्या एका कंपनीला काॅन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. दरम्यान ग्राऊंड फ्लोअरवर पार्किंग आणि वरती प्रशस्त सांस्कृतिक भवन, असा हा प्रोजेक्ट आहे. आता पार्किंग तयार करण्यासाठी 15 फूट खोल जमीन खणली गेली. साहजिकच येथून माती निघणारच.

ही मूल्यवान माती उपयोगात यावी, म्हणून कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून समजले जाणारे भंडारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी खणन केलेल्या भागातून दीड किलोमीटरच्या आत ही माती डम्पिंग करण्याचे आदेश काढले. शिवाय नगर परिषदेने सुचवलेल्या ठिकाणी ही माती टाकून उपयोगात आणण्याचे आदेश काम करणाऱ्या तिरोडाच्या त्या कंपनीसाठी काढले.

सुरुवातीला भंडारा शहरातील सागर तलाव उद्यानाजवळ पाळीवर ही माती उपयोगात आणली गेली. नंतर राजीव गांधी चौकाकडून जिल्हा परिषद चौकाकडे जाणाऱ्या संत शिवराम शाळा विदर्भ हाऊसिंग बोर्ड कॉलनीजवळ या मातीचे डम्पिंग करण्यात येत आहे. भविष्यात पाण्याची टाकी, रस्ता, बगीच्या निर्माण करतेवेळी याचा उपयोग होईल, या उद्देशाने मुख्याधिकाऱ्यांनी हे आदेश काढले आहेत.

दरम्यान बिलाचे शोधन करत असताना माती टाकण्याचा पुरावा नगरपरिषदेला द्यावा लागेल, असेही त्या आदेशात नमूद आहे. पुरावा न दिल्यास बिलाचे शोधन करण्यात येणार नाही. तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. असे असताना माजी नगरसेवकाने नगरपरिषद आणि मुख्याधिकाऱ्याच्या डोळ्यात धूळ फेकत रात्री आपल्या पुतण्याच्या टिप्परने गांधी शाळेच्या निर्माणधीन जागेवरून खणलेली माती चोरण्यास सुरुवात केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेष म्हणजे भंडारा शहरात ओव्हरलोड वाहतूक बंद असतानासुद्धा या माजी नगरसेवकाने चक्क शहरातूनच वाहतूक सुरू ठेवलेली आहे. आतापर्यंत 200 ट्रक माती त्याने चोरून नेली असल्याचे सूत्र सांगतात. चोरलेल्या मातीची किंमत लक्षात घेतली तर ही कोट्यवधींच्या घरात जाते. तर दुसरीकडे ज्या कंपनीला हे काम मिळाले आहे, ती कंपनी हे काम करत नसून भंडारा शहरातील एक ठेकेदाराकडून हे काम करवून आहे.

हा ठेकेदारही मुख्याधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत पांढरबोडी येथील खाजगी लेआऊटवर ही माती टाकत आहे. आता पर्यंत 3000 ट्रॅक्टर माती येथून काढल्याची माहिती आहे. असा दुहेरी माती चोरीचा प्रकार भंडारा नगरपरिषदेच्या निर्माणधिन भागातून होत आहे.

विशेष म्हणजे महसूल विभागाचे कार्यालय, खणन विभागाचे कार्यालय आणि शेवटी नगर परिषदेचे कार्यालय ही या तस्करीच्या ठिकाणाहून जवळ असतानाही अधिकाऱ्यांची नजर या गोष्टीवर गेली का नाही, हा प्रश्नही यातून निर्माण होत आहे. त्यामुळे आता भंडारा नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी काय दंडात्मक कारवाई करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT