Bhandara Encroachment News : यंदाचे वर्ष अतिक्रमणामुळे सदस्य अपात्र होण्यासाठी गाजते की काय, असे वाटू लागले आहे. भंडारा जिल्ह्यात एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य अपात्र होण्याची घटना घडली आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या कायद्याचा दंडुका बघता यंदा भंडारा जिल्ह्यात अपात्र होण्याची हॅट्रिक करणार यात शंका नाही.
अतिक्रमण प्रकरण भोवल्याने सिल्ली येथील सरपंच तर चिचाळचे 3 ग्रामपंचायत सदस्य अपात्र झाले आहेत. भंडारा तालुक्यातील सिल्ली येथील सरपंच सुचिता पडोळे यांच्या राहत्या घराच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम शासकीय जागेवरील दोन मीटरचे अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी सरपंचपदावरून अपात्र करण्याचे आदेश दिले आहेत. तर लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चिचाळ/कोदा. येथील तीन ग्रामपंचायत सदस्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना जिल्हाधिकारी भंडारा यांच्या आदेशान्वये मनोहर जयराम रंगारी, राजू मदन ठलाल, बालाबाई दुर्योधन चव्हाण यांना अपात्र घोषित करण्यात आले.
सरपंच सुचिता पडोळे यांनी शासकीय भूमापन क्र. 974 आराजी 0.01 हे. आर. जागेवर अतिक्रमण करून घराचे बांधकाम केल्याने त्यांना अपात्र घोषित करा, अशी मागणी ईश्वर कळंबे यांनी केली होती. उपअधीक्षक भूमी अभिलेख भंडारा व सचिव ग्रामपंचायत सिल्ली यांचा संयुक्त अहवाल 19 ऑक्टोबर 2023 चे अवलोकन केले. त्यात पडोळे यांचे राहते घर मालमत्ता क्र. 919 च 920 ला लागून असलेल्या सरकारी रस्त्याची संयुक्त मोजणी केली असता, त्यांच्या इमारतीचे बांधकाम सरकारी रस्त्यावर केल्याचे नमूद केले.
11 ऑक्टोबर 2023 रोजी उपअधीक्षक भूमी अभिलेख भंडारा व सचिव ग्रामपंचायत सिल्ली यांनी मोजणी केली असता त्यांची मिळकत मालमत्ता क्र. 876 ला लागून असलेल्या सरकारी रस्त्याची मोजणी करण्यात आली. यात राहत्या इमारतीचे बांधकाम सरकारी रस्त्यावर 2 मीटर अतिक्रमण केल्याचे दिसून आले आहे.
ग्रामपंचायत सदस्य राजीव ठलाल यांच्या स्वतःच्या नावाने अतिक्रमण नसून वडील मदन ठलाल यांचे 1652 चौ. फूट मोकळे जागेवर अतिक्रमण आढळून आले. मनोहर जैराम रंगारी यांचे वडील जैराम रंगारी यांनी 224 चौ. फूट जागेवर स्लॅबचे घर तयार करून अतिक्रमण केल्याचे आढळून आले. बालाबाई चव्हाण रा. कोदामेडी यांच्या नावाने 2012 ला दोन भूखंडावर अतिक्रमण करून बांधकाम केल्याचे आढळून आले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम (14)1( जे ३) अन्वये दोषी दिसून येत असल्याने त्यांना अपात्र ठरवून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी न्यायालयातून काढण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांच्या दालनात अजूनही ग्रामपंचायत सदस्य सरपंचाच्या अतिक्रमणाच्या तक्रारींची फाईल पेंडिंग पडलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लावलेल्या कारवाईच्या सपाटा बघता यंदा जिल्हाधिकारी अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून अपात्र करण्याचा दंडाची हॅट्रिक करणार अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.