Bhandara Zilla Parishad Sarkarnama
विदर्भ

Bhandara Zilla Parishad : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून उपाध्यक्षांची थेट सीईओंना धमकीच

अभिजीत घोरमारे

Bhandara Zilla Parishad : बमृदुभाषी म्हणून नेहमी ओळखले असलेल्या भंडारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप टाले यांच्या रौद्ररूपाचा अनुभव सदस्यांसह नुकताच आला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यांनी थेट धमकीच दिली. जिल्हा परिषदेच्या आमसभेत उपाध्यक्ष ढाले यांच्या संतापाचा पारा चढला. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून त्यांनी जिल्हा परिषदेच्या सभेत थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याचा इशारा दिल्याने सर्वांनाच धक्का बसला.

जिल्हा परिषदेचे 2023-24 वर्षांसाठीचे अंतिम सुधारित व 2024-25 वर्षाचे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यासाठी विशेष सभा आणि सर्वसाधारण सभा एकाच दिवशी आयोजित करण्यात आली होती. एकाच दिवशी विशेष सभा आणि सर्वसाधारण सभा बोलावल्याबद्दल काही सभासदांनी सभेच्या सुरुवातीलाच आक्षेप घेतला. काही सदस्यांना सभेचे नोटीसच मिळाले नसल्याचे या वेळी सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. आता आमसभेची सुरुवातच आक्षेपाने झाली म्हटल्यावर पूर्ण सभा शांततेने कशी पार पडेल, याचा विचार न केलेलाच बरा. झालेही अगदी तसेच.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गणेशपूर येथील दलितवस्ती सुधार योजनेत काम न करता निधी खर्च झाल्याचे दाखविल्याची बाब जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांनी निदर्शनास आणून दिली. 8 जानेवारी 2024 रोजीच्या सभेत तक्रार करूनही ग्रामविकास अधिकारी, खंडविकास अधिकाऱ्यांविरुद्ध भंडारा जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी कसलीही दखल घेतली नाही. यावरून भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांचा हा मुद्दा पुढे रेटत संदीप टाले यांनी वादात उडी घेतली. गणेशपूरचेच नाही तर अनेक ग्रामपंचायती आणि पंचायत समिती स्तरावरून येणारी अशी अनेक प्रकरणे आहेत. मात्र, त्या तक्रारींची दखल घेतली जात नाही, असे ते म्हणाले.

भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी कोणतीही कारवाई करीत नाहीत. त्यामुळे त्यांची जबाबदारी काय, ते करतात तरी काय, असा प्रश्न उपस्थित करून संदीप टाले यांनी संताप व्यक्त केला. थेट आरोप करीत उपाध्यक्ष संदीप टाले यांनी अक्षरशः सीईओंची खरडपट्टी काढली. फायलींची आदळआपट करून त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. मुख्य कार्यकारी अधिकारी अशा प्रकरणात लक्ष घालत नसतील, तर त्यांच्यावरही अविश्वास प्रस्ताव आणला जाईल, असा थेट इशाराच त्यांनी दिला. जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले आणि बीआरएसचे नेते चरण वाघमारे यांनी संदीप टालेंच्या रूपाने भाजपचा एक गट फोडूनही जिल्हा परिषदेवर सत्ता आणली होती. मात्र, कालांतराने संदीप ढाले यांनी माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वात पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केली आहे. सुरुवातीपासूनच जिल्हा परिषद उपाध्यक्ष टाले यांना स्वतःबद्दल अनसुरक्षित वाटत असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभेत त्यांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचे बोलले जात आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT