Nagpur News: हिवाळी अधिवेशनास न फिरकलेल्या आमदारांच्या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या कशा? असा रोखठोक सवाल करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांना केला. तसेच, २९३च्या प्रस्तावावर ८६ आमदारांच्या स्वाक्षऱ्या असून प्रत्यक्षात मात्र यापैकी १७ आमदार अधिवेशनास गैरहजर असल्याची गंभीर बाब भास्कर जाधव यांनी उघड केली. शिवाय, या प्रकारावर विधानसभा अध्यक्षांकडे उत्तरही मागितले.
सत्ताधाऱ्यांच्या या प्रस्तावावर बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे. शिवाय जर आमदार अधिवेशनासच उपस्थित नसतील तर त्यांच्या स्वाक्षऱ्या कोणी केल्या, हे समोर आणलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी विधिमंडळ अध्यक्षांकडे केली. तसेच, भास्कर जाधव म्हणाले, मी हा मुद्दा उपस्थित केल्याने सत्ताधाऱ्यांकडून विरोध झाला. मात्र मी हजेरीपटावरून हे सिद्ध केलं आहे की १७ आमदार गैरहजर असूनही त्यांच्या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत.
याशिवाय दोन दिवसानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार काल हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले होते. यावरही भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी टोला लगावत मी अजितदादांना त्यांचा घसा खराब असल्याने खोगोची गोळी देणार आहे, ती अजितदादांनी घशात ठेवावी, असंही म्हटलं.
खरंतर मंत्रिमंडळ विस्तार झाल्यापासून अजित पवार गायब होते. नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही ते दिसत नव्हते. घशाला त्रास होत असल्याने त्यांना डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला दिला गेला होता, अशी माहिती त्यांच्या पक्षाकडून समोर आली आहे. परंतु भुजबळांना (Chhagan Bhujbal) मंत्रिमंडळातून डिच्चू दिल्यानंतर भुजबळांनी घेतल्या आक्रमक भूमिकेमुळे अजित पवार माध्यमांपासून दूर राहण्यासाठीच गायब होते, अशी चर्चा सुरू आहे.
अजित पवारांबाबत (Ajit Pawar) कोणी म्हणत होतं की ते दिल्लीत गेले, तर काहींनी नागपूरमध्येच असल्याचा दावा केला होता. एवढच नाहीतर मंत्रिमंडळाच्या विस्तार आणि खातेवाटपवारून ते नाराज असल्याचेही सांगण्यात येते. मात्र, बुधवारी ते विधानसभेत दाखल झाले. तासभर बसून होते मात्र, ते एक शब्दही बोलले नाहीत. माध्यमांशी संवाद साधण्याचेही टाळले. त्यामुळे आता त्यांच्या मौन रागाचीही चर्चा रंगली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.