Vidharbh News : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून पाच वेळा निवडून आलेल्या आणि शिवसेनेच्या प्रतोदपदाची जबाबदारी पार पाडणाऱ्या भावना गवळी यांना अद्यापही शिवसेनेने उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे गवळी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
शिवसेनेत झालेल्या बंडानंतर खासदार गवळी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणे पसंत केले. शिंदे यांनी दिलेली शिवसेनेच्या प्रतोदपदाची जबाबदारीदेखील पार पाडली, असे असतानाही शिंदे गटाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत गवळी यांना वगळण्यात आल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून गवळी या सहाव्यांदा इच्छुक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत गवळी यांचे नाव नक्कीच असेल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, या यादीत त्यांचे नावच न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांच्या जागेवर शिंदे गटाकडून संजय राठोड यांना संधी देण्याची चर्चा आहे. त्यामुळे गवळी यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भावना गवळी यांची उमेदवारी जाहीर करा, नाहीतर आम्ही राजीनामे देणार,असा गर्भित इशाराच शिवसैनिकांनी दिला आहे. त्यामुळे गवळी यांना उमेदवारी न दिल्यास वाशीम-यवतमाळमध्ये राजीनाम्यांचा पाऊस पडणार का ? अशी चर्चा आता रंगली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू अशी ओळख गवळी यांची आहे. संसदेत त्यांच्याकडे शिवसेनेच्या प्रतोदपदाची जबाबदारी आहे. मात्र, त्यांचे नाव जाहीर न झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे काही दिवस आहेत. गवळी यांना उमेदवारी जाहीर करावी, अन्यथा पदाधिकारी, कार्यकर्ते थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामूहिक राजीनामे देतील, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, अमरावती मतदारसंघात नवनीत राणा यांना विरोध असताना भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर केली. यवतमाळ मतदारसंघात भावना गवळी यांना कोणाचाही विरोध नाही तरीही त्यांची उमेदवारी का जाहीर केली जात नाही, असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.
कार्यकर्त्यांनी घाई गडबड करू नये, असे आवाहन खासदार भावना गवळी यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्या कामाची दखल नक्की घेतील. गेली 25 वर्षे मी काम करत आहे. उमेदवारी अद्यापही जाहीर न झाल्याने कार्यकर्ते नाराज असणारच त्यामुळे त्यांची भावना ते व्यक्त करत आहेत. कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये, घाईगडबड करू नये, असे भावना गवळी म्हणाल्या.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.