Prakash Ambedkar - Uddhav Thackeray  Sarkarnama
विदर्भ

Prakash Ambedkar : "...असे आमचे त्यावेळी ठरले होते!"; आंबेडकरांचे ठाकरेंबाबत खळबळजनक विधान

Deepak Kulkarni

Nagpur News : वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. पण ठाकरे गटासोबत युती झालेली असताना वंचितचे महाविकास आघाडीसह इंडिया आघाडीतील सहभागाचे अनेक महिन्यांपासून भिजत घोंगडे राहिले आहे. यातला संभ्रम अद्यापतरी दूर झालेला नाही. यातच आता आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंबाबत खळबळजनक दावा केला आहे.

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची सोमवारी नागपुरात सभा होत आहेत. या सभेआधीच त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, ठाकरे आणि आमची आधीच युती झाली आहे. त्यावेळी आमच्या दोघांत एक गोष्ट ठरली आहे. ठाकरे गट- काँग्रेस किंवा ठाकरे गट- राष्ट्रवादी किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी झाली नाही तर ठाकरे गट आणि वंचितने 50-50 जागा लढवण्याचे आमच्या ठरले आहे. म्हणजे लोकसभेच्या 24 जागा उद्धव ठाकरे आणि 24 जागा लढणार असे आमचे ठरले होते. आमच्यात ही मोघम अंडरस्टँडिंग झाली असल्याचेही आंबेडकरांनी सांगितले.

...तर फॉर्म्युला वेगळा होईल!

प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीचे काहीच ठरले नाही तर मग आम्ही फिफ्टी-फिफ्टी लढणार आहोत. पण त्यांचं जागा वाटप ठरले तर मग फॉर्म्युला वेगळा होईल.आघाडीचे काही झाले नाही आणि प्रत्येकाने वेगळे लढायचे ठरले तर राजकीय पक्ष म्हणून आम्हालाही लढावे लागणार आहे. अन्यथा आगामी लोकसभा आम्ही स्वबळावर लढणार असून 48 जागा लढवण्याची आमची तयारी आहे अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.

...तर संसदेवर ताबा मिळविण्याशिवाय पर्याय नाही!

देशात पूर्वी मंदिरांमधून सत्ता चालविली जात होती.आता सत्तेचे केंद्र बदलले आहे.देशातील सत्तेचे केंद्र हे संसद आहे. ज्याचा संसदेवर ताबा, तोच देशात सत्ता चालवू शकतो. त्यामुळे मनुवादाची सत्ता उलथवायची असेल, तर संसदेवर ताबा मिळविण्याशिवाय पर्याय नाही, असे आंबेडकर म्हणाले. देशात दबावाचे आणि ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण सुरू आहे असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.

प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरमधील वंचित बहुजन आघाडीच्या सभेत मोदी शाहांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले,नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या 56 इंचाच्या छातीत केवळ गाठ्या आणि फाफडा आहे. त्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही. वेगवेगळे लढाल तर मोदी संपवून टाकतील. एकत्र लढाल तर या 56 इंचाच्या छातीला मातीत मिसळविता येईल, ही बाब ‘इंडिया’ आघाडीने समजून घेतली पाहिजे. मोदी आणि संघाने अनेक चुका केल्या आहेत. त्यांनी तुमच्यावर बोट ठेवले तर तुम्ही त्याला प्रत्युत्तर द्या, असे आवाहनही त्यांनी समविचारी पक्षांना केले.

तसेच ‘इंडिया’ आणि महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीसोबत आली तर स्वागतच आहे. परंतु सोबत आले नाही तर स्वबळावर मनुवादाविरोधात लढण्याची तयारी ठेवा असे आवाहनही अॅड. आंबेडकर यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना दिला.(Shivsena UBT)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT