Naxal  Sarkarnama
विदर्भ

गडचिरोली पोलिसांचे मोठे यश, चकमकीत मिलींद तेलतुंबडे ठार?

पोलिसांनी २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले असून तीन पोलिस जवान जखमी झाले, अशी माहिती गडचिरोलीचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल Ankit Goyal यांनी एएनआयला दिली.

सरकारनामा ब्यूरो

गडचिरोली : जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील कोटगुल जंगल परिसरात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये आज पहाटे पाच वाजतापासून सुरू असलेल्या चकमकीत नक्षली म्होरक्या मिलींद तेलतुंबडे ठार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्हा पोलिस अधिक्षकांनी या वृत्ताची पुष्टी केली नसली तरी तशी दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. या चकमकीत पोलिसांनी २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले असून तीन पोलिस जवान जखमी झाले, अशी माहिती गडचिरोलीचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी एएनआयला दिली.

दरम्यान ठार झालेल्यामध्ये नक्षलवाद्यांचे दोन मोठे नेते असल्याची माहिती आहे. त्यांपैकी एक मिलींद तेलतुंबडे असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारावर धानोरा तालुक्यातील कोटगुल या घनदाट जंगल परिसरात पोलिसांचे सी-६० दल गस्त घालीत असताना नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिस दलानेही गोळीबार सुरू केला. या गोळीबारात २६ नक्षलवादी ठार झाल्याचे कळते.

घटनास्थळी अद्याप पोलिसांची कारवाई सुरूच असून, मृत नक्षलवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सी-६० कमांडोची टीम नक्षलविरोधी कोटगूल परिसरातील मरभिनटोला गावाजवळच्या जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना तिथे दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर बेछूट गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी पोलिसांनी अभूतपूर्व शौर्य दाखवत केलेल्या गोळीबारात २६ नक्षलवाद्यांना कंठस्सान घातले. यात चार पोलिस जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सी-६० दलाच्या १५ ते १६ टीम या जंगल परिसरात असून अद्याप कारवाई सुरूच आहे.

दोन मोठ्या म्होरक्यांचा समावेश, गृहमंत्रायंनी केले कौतुक..

मृतांमध्ये नक्षलवाद्यांच्या दोन मोठ्या म्होरक्यांचा समावेश असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यापैकी एक म्होरका हा मिलीटरी कमांडर मिलींद तेलतुंबडे असल्याची माहिती असून दुसरा प्रमुख म्होरक्या महाराष्ट्रातील एका प्रकरणात आरोपी असल्याची माहिती सुत्रांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मरभीनटोला गावानजीक कोटगुलच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे. ‘आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,’ अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले.

आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या सी-६० दलाने मिळालेल्या माहितीआधारे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली. या कामगिरीबद्दल महाराष्ट्र विशेषतः गडचिरोली पोलिसांचे गृहमंत्र्यांनी मनपूर्वक अभिनंदन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT