Nana Patole
Nana Patole Sarkarnama
विदर्भ

BJPने शिंदे गटाला एकही जागा दिली नाही, ‘महाविकास’ म्हणून आम्ही पुढे जातोय...

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Teachers Constituency Election : गेल्या वर्षी नागपूर (Nagpur) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करीत मोठा विजय संपादन केला होता. आता नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सावध पावले टाकताना दिसत आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी जिंकणार, असा विश्‍वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

आमचा प्रयत्न आहे की सेनेचे उमेदवार, डायगव्हाणे आणि कपील पाटील यांचा उमेदवार, यांच्यात बैठक घेऊन हमखास निवडून येणाऱ्या उमेदवारासोबत राहू. कॉंग्रेसमध्ये (Congess) कुणाचीही आणि कशाचीही नाराजी नाही. कॉंग्रेसमध्ये गोंधळ सुरू आहे, असे जे विरोधक बोलत आहेत, ते दाखवा असे आव्हानच नाना पटोले (Nana Patole) यांनी दिले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) शिंदे गटाला एकही जागा दिलेली नाही, हे अपेक्षितच होते.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्व काही आमच्या अपेक्षेप्रमाणे घडत आहे. त्यामुळे नागपूर पदवीधरप्रमाणे या निवडणुकांचे निकाल लागतील. नाशिकमध्ये भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. कारण त्यांना तेथे उमेदवारच मिळत नाहीये. पण आमचा उमेदवार तेथे निश्‍चित झाला आहे. डॉ. सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत आणि त्यांचा विजय तेथे पक्का आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

‘ते’ सत्तेत सोबत असूनही एकत्र नाहीत. पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक आहोत आणि पुढे जातोय, असे नाना पटोले म्हणाले. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली की नाही आणि झाली असेल, तर हा त्यांचा प्रश्न आहे. त्याबाबत मी काही बोलणार नाही. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात कॉंग्रेस उमेदवार देणार नाही. येथे विनिंग पोझीशनच्या उमेदवारासोबत कॉंग्रेस असणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या पदवीधरप्रमाणे आता शिक्षक मतदारसंघाचा निकाल असेल, असे नाना पटोले यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नागपुरात झालेल्या प्रदेश कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला आले नव्हते. पण आज ते ब्रम्हपुरीला येत आहेत. याबाबत विचारले असता, तेव्हा अशोक चव्हाण यांची प्रकृती ठीक नव्हती. बैठकीला येत नसल्याबद्दल त्यांनी तसे कळवले होते आणि परवानगी घेतली होती. आज ते ब्रम्हपुरीला येत आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती आता चांगली झाले असेल, असे नाना पटोले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT