BJP Sarkarnama
विदर्भ

BJP Internal Rift : भाजपचा बालेकिल्ला अस्वस्थ! नगरसेवकांची दांडी, नेत्यांमध्ये कुरघोडी अन् ‘जेन झी’चा धसका

Nagpur BJP Internal Rift : देशातील 'जेन झी'च्या वाढत्या आंदोलनांमुळे आणि तरुणांच्या बदलत्या भूमिकेमुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अस्वस्थता कमालीची वाढली. अशा स्थितीत पक्षाला तळागाळातील कार्यकर्त्यांची साथ सर्वात जास्त गरजेची आहे. परंतु, पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले नगरसेवकच आता प्रभागातून गायब आहेत.

राजेश रामपूरकर

Nagpur News, 04 Sep : 'पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान' आणि 'एसआयआर'च्या माध्यमातून कार्यकर्त्यांना कामाला जुंपणाऱ्या भारतीय जनता पक्षात सध्या शैथिल्य आलेले आहे. त्यात 'जेन झी'च्या आंदोलनांमुळे भाजप नेत्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता स्पष्ट दिसते. त्यात अंतर्गत कुरघोडीने भाजपमध्ये शीतयुद्ध रंगले असल्याचे दिसते आहे.

2029 पर्यंत कोणतीही मोठी निवडणूक नाही. पण कार्यकर्त्यांची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांना सक्रिय ठेवण्यासाठी पक्षाने पुन्हा बैठकांचे सत्र सुरू केले. पुण्यात कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात दहा लाख युवकांना 'भाजप युवा वॉरियर बनवा' असा टास्क दिला. यानिमित्ताने राज्यभरातील युवा कार्यकर्त्यांना 'चार्ज' करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

राज्य पातळीवर संघटन मजबूत करण्याचे व फेक नरैटिव्हचा सामना करण्याचे प्रयत्न असले तरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि संघटन पातळीवर अंतर्गत बेबनाव चव्हाट्यावर आलेला आहे. नागपूरसारख्या पक्षाच्या बालेकिल्ल्यातच नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमधील सुसंवादाचा अभाव पक्षाच्या चिंतेत भर घालत आहे.

नुकतीच परिवहन सभापतींनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकांनी मारलेली दांडी हे याचेच ज्वलंत उदाहरण आहे. स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरूनही पक्षात अंतर्गत नाराजीचे सूर उमटत आहेत. व्यक्तीनुसार कार्यपद्धती बदलते, हे गृहित धरून प्रशासन आणि नगरसेवकांनी जुळवून घेणे अपेक्षित असते.

बदल न स्वीकारता जाहीर नाराजी व्यक्त करणे पक्षाच्या शिस्तीत बसते का? चुकांवर आवाज उठवणे लोकशाहीत योग्य असले, तरी महापालिकेत महिलांकडे नेतृत्व आल्यापासून काही घटकांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आहे का, असा सवाल उपस्थित होतो. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातील काही नगरसेवकांची गैरहजेरी ही केवळ योगायोग होती की नियोजित बहिष्कार, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

कार्यकर्त्यांची मेहनत, तिसऱ्यांदा सत्ता

ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता जनतेशी संपर्क ठेवला, त्यांच्याच बळावर महापालिकेत पक्षाची सलग तिसऱ्यांदा सत्ता आली. मात्र, पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले काही नगरसेवक आता प्रभागात फिरण्यासही टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

कार्यकत्यांची ही उपेक्षा पक्षसंघटनेसाठी घातक ठरू शकते. शहरात दोन खंबीर आणि ताकदवान नेतृत्व असले, तरी जमिनीवर काम करणारी कार्यकर्त्यांची फळीच पक्षाचा खरा पाया असते. नगरसेवकांनी आणि नेत्यांनी सत्तेच्या हवेत न तरंगता, वेळीच सतर्क होऊन जनतेशी नाळ कायम ठेवायला हवी. कार्यकत्यांमधील असंतोष असाच वाढत राहिला आणि ते सैरभैर झाले, तर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकायला वेळ लागणार नाही.

जेन झी'चे आंदोलन अन् नेत्यांची घालमेल

दुसरीकडे, देशातील 'जेन झी'च्या वाढत्या आंदोलनांमुळे आणि तरुणांच्या बदलत्या भूमिकेमुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अस्वस्थता कमालीची वाढली. अशा स्थितीत पक्षाला तळागाळातील कार्यकर्त्यांची साथ सर्वात जास्त गरजेची आहे. परंतु, पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले नगरसेवकच आता प्रभागातून गायब आहेत. जनतेशी असणारा संपर्क तुटत चालल्याच्या तक्रारींचा डोंगर उभा राहिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT