state government sand policy; Sudhir Mungantiwar sarkarnama
विदर्भ

Sudhir Mungantiwar : 'माझ्या पराभवासाठी वाळू माफियांनी केले पैशाचे वाटप', मुनगंटीवारांचा स्फोटक दावा; आपल्याच सरकारचे वाभाडेही काढले

state government sand policy : हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशी महायुती सरकारच्या वाळू धोरणावर चर्चा झाली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्फोटक दावा केला.

Rajesh Charpe

  1. भाजपा नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत महायुती सरकारच्या वाळू धोरणावर तीव्र हल्लाबोल केला.

  2. सरकार ‘रेती विक्रीचा धंदा’ करत असल्याची टीका करीत त्यांनी या धोरणावर तातडीने पुनर्विचार करण्याची मागणी केली.

  3. विधानसभेच्या निवडणुकीत स्वतःला पराभूत करण्यासाठी रेती माफियांनी पैशाचे वाटप केल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला.

Nagpur News : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत आपल्या सरकाराच्या निर्णयावर सडकून टीका करून वाभाडे काढले. महायुती सरकारच्या वाळू धोरणावर बोलता त्यांनी सरकाराला तुम्ही रेती विकण्याचा धंदा करू नका, असे सांगून त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत मलाच पाडण्यासाठी काही रेती माफियांनी पैशाचे वाटप केल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान महायुती सरकारच्या वाळू धोरणावर मुनगंटीवार यांनी कडाडून टीका केली. वाळू धोरणाच्या आडून सरकार वाळू विकण्याचा धंदा करीत आहे. त्यापेक्षा वाळू फुकट द्या. बांधकामावर सेस लावा. त्यामुळे तुलनेत दुप्पट महसूल सरकारच्या तिजोरी जमा होईल. याशिवाय रेती माफिया निर्माण होणार नाही तसेच पोलिसांवर ताणही येणार नाही अशी सूचनाही त्यांनी केली.

याचवेळी त्यांनी, मी मंत्री असताना अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या गाड्याच जप्त करीत होतो. त्या सरकारकडे जमा करीत होतो. मात्र आता पुन्हा एकदा वाळू माफिया शिरजोर झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या अंगावर गाड्या घालण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीत मला पराभूत करण्यासाठी काही रेती माफियांनी पैशाचे वाटप केले. यावरून जनशक्तीपेक्षा धनशक्ती मोठी झाल्याचे दिसून येते अशा शब्दात त्यांनी सरकारला सुनावले.

कृषी समृद्ध योजनेवरही मुनगंटीवार यांनी टीका केली. योजना जाहीर करायची मात्र ती राबवायला कर्मचारीच द्यायचे नाही. कर्मचारी दिले तर गाड्या नाही, संगणक नाही द्यायचे. मी स्वतः संगणक घ्यायला २२ कोटींचा निधी दिला होता. मात्र त्यावरसुद्धा अधिकारी निर्णय घेत नाही. अशा अधिकाऱ्यांना बांधून उपाशी ठेवा व त्याच्या समोर स्वादिष्ट जेवणाची डिश ठेवा. तेव्हा त्याला शेतमाल आणि शेतकऱ्याचे महत्त्व कळेल. दोन दोन महिने फाईल पेंडिंग ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिक्षा ठोठवा. धानाला बोनस द्यायचाच आहे तर देऊन टाकाल, शेतकऱ्यांना का सडवत ठेवता, तारखा का देता असाही सवाल त्यांनी कृषिमंत्र्यांना केला.

केळकर समितीने पंजाबराव देशमुख विद्यापीठाचे एक केंद्र चंद्रपूरमध्ये सुरू करण्याची शिफारस केली होती. आम्ही बाराशे एकर जागा शोधून ठेवली आहे. मात्र सरकार निर्णयच घेत नाही. आम्हाला सरकारी नोकऱ्यांसाठी डिग्री देणारे विद्यापीठ नको आहे तर संशोधन करणारे, शेतकऱ्यांना सल्ला देणारे, तंत्रज्ञानाचा वापर करणारे आणि शेतमालाची उत्पादकता वाढवणारे विद्यापीठ हवे असल्याची सूचना त्यांनी केली. कृषी मंत्री मामा भरणे यांचा उल्लेख करून तुम्ही स्मार्ट निर्णय घ्या तेवढाच स्मार्ट पुतळा मी चंद्रपूरमध्ये उभारतो असेही मुनगंटीवार म्हणाले.

FAQs :

1. सुधार मुनगंटीवार यांनी सरकारवर नेमका कोणता आरोप केला?

त्यांनी सरकारचे रेती धोरण चुकीचे असल्याचा आरोप करत, "सरकार रेती विक्रीचा धंदा करू नका" असे सांगितले.

2. त्यांनी रेती माफियांविषयी काय दावा केला?

निवडणुकीत त्यांना पराभूत करण्यासाठी काही रेती माफियांनी मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप केल्याचा त्यांनी दावा केला.

3. आरोप कुठे आणि कधी करण्यात आले?

हे आरोप महाराष्ट्र विधानसभेत केले गेले.

4. हा वाद महायुती सरकारसाठी का महत्त्वाचा आहे?

कारण हा आरोप थेट सरकारी धोरण आणि त्यातील भ्रष्टाचारावर बोट ठेवतो.

5. सरकारकडून यावर प्रतिक्रिया आली आहे का?

सध्यातरी अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT