Protest banner in Chincholi Rudrayani of Akola Sarkarnama
विदर्भ

Protest in Akola : वादानंतर ग्रामस्थांची अशीही युक्ती; भाजपच्या आमदाराला गावात पाय न ठेवण्याची सक्ती

जयेश विनायकराव गावंडे

Akola Political News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या राज्यभर नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. गावबंदीचे हे लोण विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहे. पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शहर असलेल्या अकोला जिल्ह्यातीलही एका गावानं भाजपच्या एकाच आमदाराला गावात पाय ठेऊ नका असा इशारा दिलाय. परंतु या आंदोलनाला रस्त्यावरून झालेल्या वादाची व राजकीय चढाओढीची किनार आहे.

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात आणि बार्शीटाकळी तालुक्यात येणाऱ्या चिंचोली रुद्रायणी या गावातील हा वाद आहे. नवरात्र उत्सवादरम्यान भाजपचे आमदार हरीश पिंपळे चिंचलीतील देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी रस्त्याचे काम अद्यापपर्यंत का झाले नाही, यावरून काही तरुणांनी गर्दी करीत आमदार पिंपळे यांना जाब विचारला. या वेळी तरुण व आमदार पिंपळे यांच्यातील वाद चांगलाच वाढला. आमदार पिंपळे यांचाही पारा चढला. त्यावेळी जमलेल्या तरुणांपैकी युवासेना तालुका प्रमुख रुद्रांश राठोड यानं ‘हात नाही लावायचा साहेब.. आमदार करून दिलं तर प्रश्न तर विचारणारच..’ असं संतप्त उत्तर दिलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला. (BJP MLA banned from village in Akola district)

तरुणासह जमलेली गर्दी आणि आमदार पिंपळे यांच्यातील हा वाद मिटविण्यासाठी बार्शीटाकळी पोलिसांनी मध्यस्थी केली. या प्रकरणी रुद्रांश यानं पोलिस ठाण्यात भाजपच्या दहा जणांविरोधात तक्रार दिली. प्रकरण सध्या चौकशीत ठेवण्यात आलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही या वादात उडी घेत कारवाईची मागणी केली. प्रकरण शांत झालंय असं वाटत असतानाच शनिवारी (ता. २८) कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चिंचोली रुद्रायणीत आमदार हरीश पिंपळे यांना गावबंदीचे फलक लागले अन‌् भाजपच्या गटात अमावास्येसारखा अंधार पसरला.

यंदाच्या कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण होत आहे. याच दिवशी चिंचोली रुद्रायणीच्या ग्रामस्थांनी सत्ताधारी आमदाराला गावात प्रवेशास बंदी घातल्यानं कामं न करणाऱ्या पक्षाला आम्ही मतदारांच्या साथीनं ग्रहण लाऊ शकतो, हे सर्वांनी संघटित होत दाखवून दिलं. या आंदोलनामागे युवासेना असल्याचं सांगण्यात येत असलं तरी विशेष बाब म्हणजे त्याला संपूर्ण परिसरातील ग्रामस्थांचाही पाठिंबा आहे. गावातील फलकावर आमदार हरीश पिंपळे यांचं मोठं छायाचित्र लावण्यात आलय. रस्त्याचं काम जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत प्रवेश बंदी आणि खाली एक टीप लिहिण्यात आलीय. या टीपमध्ये ‘आपली मानमर्यादा राखून प्रवेश करावा’ असं नमूद करण्यात आलंय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नेमका वाद कशावरून

चिखलगाव ते धाबा, चिंचोली रुद्रायणी, वाघजाळी वरखेड, जलालाबाद, राजखेड जनुना, धाबा, बार्शीटाकळी ते पाटखेड, सोनगिरी-पाटखेड रस्ता, बार्शीटाकळी ते राजनखेड, महागाव ते राजखेड रस्त्याचे डांबरीकरण करण्यावरून हा वाद सुरू आहे. मूळात हा रस्ता करणं आपल्या अखत्यारित नाही. ही बाब जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येतं. झेडपीकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळत नसल्यानं काम करता येत नसल्याचं आमदार हरीश पिंपळे यांनी वाद झाला, त्या दिवशी समजाविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पंतप्रधान ग्राम सडक योजना किंवा मुख्यमंत्री सडक योजनेतून ही कामं करा, असा आग्रह धरण्यात आला.

असं आहे चिंचोली गाव

अकोल्यापासून अवघ्या ३० किलोमीटरवर बार्शीटाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी हे गाव. गावातील देवीचं मंदिर प्रसिद्ध आहे. देशभरात देवीची १०८ पीठं आहेत. त्यापैकी १४वं पीठ हे चिंचोली रुद्रायणीची देवी आहे. गडावर देवीचे मंदिर असून, येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. गेल्या वर्षापासून या भागातील रस्ते व्हावेत, ही ग्रामस्थांची मागणी आहे.

(Edited by : Prasannaa Jakate)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT