Akola Congress : ‘कॉटन सिटी’त पडलेली ठिणगी विझविण्याचे नानाभाऊंपुढे आव्हान

Nana Patole News : पिस्तूल काढण्यापर्यंत गेलेला वाद पटोले कसा मिटविणार?
Akola Congress
Akola CongressSarkarnama
Published on
Updated on

Akola Politics News : कापसाच्या गाठी अत्यंत बारकाईने हाताळाव्या लागतात. कापसावर जराही ठिणगी पडली की क्षणात होत्याचं नव्हतं होते अन‌् आगडोंब उसळतो. बरं ही कापसाची आग काही केल्या लवकर विझता विझत नाही.

अशीच ठिणगी सध्या ‘कॉटन सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोल्याच्या काँग्रेसमध्ये पडली आहे. दोन नेत्यांमधील वाद असा पुढे आलाय की प्रकरण पिस्तूल काढण्यापर्यंत गेल्याचं सांगण्यात येते.

हा वाद मिटवून निवडणुकीच्या तोंडावर अकोल्यातील काँग्रेसचं ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचं मोठे आव्हान प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना पेलावं लागणार आहे. (A challenge to Nana Patole to extinguish the spark in 'Cotton City' Akola)

अकोला काँग्रेसमधील हा वाद वेळीच मिटविण्यासाठी नानाभाऊ शुक्रवारी (ता. २७) अकोल्यात येत आहेत. अकोला जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत वाद थांबता-थांबेना असा आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजी इतकी वाढलीय की कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही.

हे सारं चाललंय ऐन निवडणुकीच्या तोंडावर. त्याचा फटका पक्षाला बसण्याची भीती व्यक्त होत आहे. उपराजधानी नागपुरातील आढावा बैठकीतील राडा याची देही, याची डोळा अनुभवणाऱ्या नानाभाऊंनी आता अकोल्यातील वाद मिटविण्यासाठीही पाऊल पुढं टाकलंय.

दोन नेत्यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा अकोला दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. वादामुळे एकेकाळी अकोल्यातील काँग्रेसच्या गडाचे बुरूज केव्हाच कोसळले आहेत.

काँग्रेस गेल्या दोन दशकांपासून जिल्ह्यात ‘बॅकफूट’वर असल्याचे कार्यकर्तेच सांगतात. आगामी निवडणुकीसाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज असताना काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली आहे.

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांविरोधातच गेल्या काही दिवसांपासून एक गट सक्रिय झाला आहे. जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांना पदावरून हटविण्याची मागणी हा गट करीत आहे. अशात काँग्रेसचे दोन प्रतिष्ठित नेत्यांनी ऐन पत्रकार परिषदेत एकमेकांवर डोळे वटारल्याने संत्रानगरीतील काँग्रेसमध्ये जसा कटवडपणा आला तसाच ‘कॉटन सिटी’तील काँग्रेसमधील ठिणगीचा धूर दिसायला लागला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अकोला काँग्रेसमध्ये वादाची सुरू असलेली ही परंपरा मोडीत काढण्यासाठी स्थानिक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे धावा केला. त्यामुळे आमदार नाना पटोले स्वत:च शहरात येत आहेत. पटोले यांच्या समोरही नेत्यांना ‘ना...ना...’ कायम राहिल्यास आगामी निवडणुकीमध्ये अकोल्यात काँग्रेसचे पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वाटत आहे.

त्यामुळे पटोलेंच्या दौऱ्यादरम्यान तरी कोणताही धिंगाणा होऊ नये, यासाठी सर्वच नेते सक्रिय झाले आहेत. आता नाना स्थानिक नेत्यांना कोणता कानमंत्र देतात व नेतेही तो किती ऐकतात यावर अकोल्यातील काँग्रेसचे भवितव्य ठरणार आहे.

(Edited by : Prasannaa Jakate)

Akola Congress
Prakash Ambedkar in Akola : ''नेत्यांची परिस्थिती अशी झाली आहे की,....'' प्रकाश आंबेडकरांचं विधान!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com