Devendra Fadnavis and Pravin Pote
Devendra Fadnavis and Pravin Pote  Sarkarnama
विदर्भ

भाजपचे विधान परिषदेचे आमदार राष्ट्रवादीत जाणार? अखेर त्यांनीच दिलं उत्तर

सरकारनामा ब्युरो

अमरावती : भाजपचे (BJP) विधान परिषदेचे आमदार व माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे (Pravin Pote) हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यावर अखेर पोटे यांनीच पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे खुलासा केला आहे. यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला आता विराम मिळाला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना पोटे म्हणाले की, देशात सर्वात मोठा राजकीय पक्ष भाजप आहे. भाजपनेच मला मंत्री, आमदार केले. त्यामुळे माझ्या मनात भाजप सोडण्याचा विचारही येत नाही. मी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे वृत्त निराधार आहे. माझी बदनामी करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आले आहे. आगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे केले जात आहे. महापालिका व जिल्हा परिषदेत भाजपच सत्तेत येणार आहे. त्यामुळे माझी बदनाम करण्यासाठी मी भाजप सोडणार, हे पिल्लू बाहेर काढले आहे.

माझी राजकीय कारकिर्द भाजपमधून सुरू झाली. मी शेवटपर्यंत भाजपमध्ये असेन. मी हिंदुत्ववादी विचारसरणी अंगिकारली आहे. राज्यातील भाजप नेत्यांच्याही माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे मी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणार हे वृत्त निराधार आहे. विधिमंडळ अधिवेशनावेळी भाजपचे सर्व कार्यक्रम आणि आंदोलनात मी सहभागी होतो. मध्यंतरी भाजपच्या आंदोलनात माझ्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. सध्या देशात तसेच, राज्यात भाजपसाठी अनुकूल वातावरण आहे. असे असताना अमरावतीत राजकीय वातावरण बिघडवण्याचा प्रकार केला जात आहे. मला राजकीयदृष्ट्या बदनाम करण्यासाठी बातम्या दिल्याने भाजपला काहीही फरक पडत नाही, असेही पोटेंनी स्पष्ट केले.

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्रिपुरा येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर अमरावती शहरात काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भारतीय जनता पक्षाने बंद पुकारला होता. या बंदला हिंसक वळण लागले होते. या हिंसाचारानंतर पोलिसांनी भाजप नेते डॉ अनिल बोंडे आणि आमदार प्रवीण पोटे यांना अटक केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT