कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) आमनेसामने आले आहेत. या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. कोल्हापूर उत्तरची लढत पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील (Satej Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिष्ठेची केली आहे. यातच सतेज पाटील यांनी हद्दवाढीची घोषणा केली आहे. यावरून चंद्रकांत पाटलांनी थेट इशारा दिला आहे.
पालकमंत्र्यांनी हद्दवाढीची घोषणा करीत चार ते पाच गावांचा समावेश होईल, असे म्हटले होते. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही पालकमंत्र्यांनी हद्दवाढीची घोषणा केली आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे. ही हद्दवाढ गरजेची असल्याने आमचा त्याला पाठिंबा आहे. पण पालकमंत्र्यांनी ही घोषणा निवडणुकीसाठीची राजकीय आहे की मनापासून आहे, याचा खुलासा करावा. याचबरोबर त्यांनी हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या पाच गावांची नावेही जाहीर करावीत. म्हणजे लोक त्यांच्या घरात घुसतील की नाही ते बघा.
मतदारांवर प्रभाव पाडेल, अशी घोषणा आचारसंहिता लागू असताना करता येत नाही. कोल्हापूरची हद्दवाढ गरजेची आहे. यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ कोल्हापूरला मिळेल. त्यामुळे आम्ही हद्दवाढीला पाठिंबा दिला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हद्दवाढीचा प्रयत्न केला होता. त्यावेळी यांनीच ग्रामीण भागातील लोकांना हाताशी धरून विरोध केला होता. त्यामुळे पालकमंत्र्यांनी आता त्यांची भूमिका स्पष्ट करावा, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मृत्यूमुळे ही जागा रिक्त झाली आहे. येथून त्यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) मैदानात उतरल्या आहेत. जाधव या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांना मैदानात उतरवले आहे. कोल्हापूर उत्तरच्या मैदानात एकूण 15 उमेदवार आहेत. पोटनिवडणुकीचे मतदान 12 एप्रिलला होणार असून, निकाल 16 एप्रिलला लागणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी महसूल विभागाच्या 2 हजार 200 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण देण्यात येत आहे. याचबरोबर मतदानादिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.
कोल्हापूर उत्तरच्या मैदानातील उमेदवार
जयश्री जाधव (काँग्रेस), सत्यजित कदम (भाजप), यशवंत कृष्णा शेळके (नॅशनल सोशालिस्ट पार्टी), विजय श्यामराव केसरकर (लोकराज्य जनता पार्टी), शाहिद शहाजान शेख (वंचित बहुजन आघाडी) आणि अपक्षांमध्ये सुभाष वैजू देसाई, बाजीराव सदाशिव नाईक, भारत ऊर्फ संभाजी भोसले, मनिषा मनोहर कारंडे, अरविंद भिवा माने, मुस्ताक अजीज मुल्ला, करुणा धनंजय मुंडे, राजेश ऊर्फ बळवंत सत्याप्पा नाईक, राजेश सदाशिव कांबळे, संजय भिकाजी मागाडे या उमेदवारांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.