Akola Lok Sabha Election 2024. Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : प्रचारात भाजप आघाडीवर; ‘वंचित’ किंचितही कमी नाही

जयेश विनायकराव गावंडे

Akola : लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. अशात सर्वच पक्षांनी प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. यात सर्वात आघाडीवर आहे भाजप. भाजपकडून अकोला लोकसभा मतदारसंघात कसा विजय मिळेल, यादृष्टीने नियोजन सुरू झाले आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी प्रचारात किंचितही कमी नसल्याचे दिसत आहे. काँग्रेस सध्या प्रचारापासून दूर आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे.

लोकसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. लोकसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकते. निवडणूक मार्चमध्ये होणार आहे. हा अंदाज गृहित धरत राजकीय नेते कामाला लागेल आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

पश्चिम विदर्भातील अकोला लोकसभा मतदारसंघ गेल्या दोन दशकांपासून भाजपचा अभेद्य गड आहे. भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे हे गेल्या 20 वर्षांपासून या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण जिल्ह्यातील राजकारणात ॲड. प्रकाश आंबेडकर यांची ‘एन्ट्री’ झाली आणि काँग्रेसच्या हातातील किल्ला गेला, असे बोलले जाते.

विद्यमान खासदार संजय धोत्रे खासदार आजारी झाल्यानंतर भाजपचे काय होणार, असा प्रश्न होता. अशातही अकोल्याचा गड आपल्या हातातून निसटू नये, म्हणून भाजप जोरदार कसरत करीत आहे. मतदारसंघात व्यापक पक्षबांधणी करण्यात येत आहे. धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना भाजपने आता पुढे केले आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या मतदारसंघात अनुप यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली आहे. दुसरीकडे हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीही सरसावली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अगोदरच या मतदारसंघात निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या पक्षाकडून जोमाने तयारी करण्यात येत आहे. अॅड. आंबेडकर यांचा संपूर्ण परिवार मतदारसंघात सक्रिय झाला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडूनही निवडणुकीसाठी ‘रोडमॅप’ तयार करण्यात आला आहे. या लगबगीत काँग्रेस सध्यातरी पिछाडीवर आहे. काँग्रेसची उमेदवारी मिळण्यासाठी अनेक इच्छुक आहेत. अनेक पदाधिकारी लोकसभा निवडणुकीसाठी बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र काय होणार याबाबत अनिश्चितता आहे.

महाविकास आघाडीत ‘वंचित’चा समावेश झाल्यास अकोल्याची जागा अॅड. आंबेडकर यांनी अगोदरच आपण लढणार असल्याचे जाहीर केल्याने काँग्रेसला सोडावी लागू शकते. प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आपल्या अकोला दौऱ्यात अकोल्यातून काँग्रेसचाच खासदार लोकसभेत जाईल असा दावा केला आहे. असे असले तरी काँग्रेसमध्ये सध्या शांतताच आहे. अकोला लोकसभेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट इच्छुक दिसत नाही. येथे त्यांच्याजवळ उमेदवारही नाही. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून एका माजी आमदाराला लोकसभेसाठी उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु उद्धव ठाकरेही सध्या ‘वेट अॅन्ड वॉच’ करीत आहेत.

2024 मधील लोकसभा निवडणुकीत युवा मतदार महत्त्वाचा ठरणार आहे. युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध पक्षांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. भाजपकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून युवकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात नमो चषकाचे आयोजन केले जात आहे. ‘वंचित’ही यात पुढे आहे. त्यांनी युवकांशी संपर्क अभियान सुरू केले आहे. सुजात आंबेडकरदेखील क्रीडा स्पर्धा घेत आहेत. त्यातून युवकांना जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप, काँग्रेस आणि वंचितच्या या लढतीमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत रंगत येणार आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT