MP Sanjay Dhotre and Amol Mitkari Sarkarnama
विदर्भ

BJP vs Amol Mitkari News : आमदार मिटकरींना संसदीय कामकाजाचा अभ्यास किती? भाजपचा पलटवार !

सरकारनामा ब्यूरो

BJP's counter attack on Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी आजारी असलेले खासदार संजय धोत्रे यांच्यावर टीका करणारे ट्विट केले होते. त्यावर भाजपने पलटवार करीत केवळ प्रसिद्धीसाठी आमदार अमोल मिटकरी यांनी आपला इतिहास न तपासता टीका केली आहे, असे म्हणत भाजपचे सचिव विजयसिंह सोळंके यांनी मिटकरींचा समाचार घेतला.

त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर लावलेल्या आरोपाचे आमदार मिटकरींनी आधी उत्तर द्यावे. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार मिटकरींना संसदीय कामकाजाचा किती अभ्यास आहे, हेदेखील कळले, असा टोला विजयसिंह सोळंके यांनी लगावला. भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार संजय धोत्रे यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

आमदार अमोल मिटकरी यांनी गुरुवारी ट्विट करत अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यात त्यांनी तीन वर्षांपासून अकोल्याचे खासदार कुठे आहेत, त्यांनी संसदेत अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न मांडले नाहीत, राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावर भाजपने पलटवार केला.

अमोल मिटकरींवर त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. त्यावर आमदार मिटकरी उत्तर देत नाहीत. त्यांनी त्याबद्दल आधी बोलावे व नंतर इतर पक्षाच्या नेत्यांवर टीका करावी, असे विजयसिंह सोळंके म्हणाले. खासदार संजय धोत्रे अकोला लोकसभा मतदारसंघातून सलग चार वेळा विजयी झाले आहेत. सातत्याने लोकसभेत सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले.

गेल्या दीड वर्षापासून ते आजारी आहेत. त्याआधी केंद्रीय राज्यमंत्री होते. मंत्री म्हणून त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नव्हता, याचे साधे ज्ञान व संसदीय माहिती अमोल मिटकरींना नाही. यावरून त्यांचा लोकप्रतिनिधी नात्याने किती अभ्यास आहे, याचा प्रत्यय येतो, असा टोलाही विजयसिंह सोळंके यांनी लगावला.

अकोला लोकसभा मतदारसंघातील जनतेचा खासदार संजय धोत्रे यांच्यावर विश्वास आहे. या मतदारसंघातून भाजपला सात वेळा लोकसभेमध्ये विजयी करण्याचे कार्य जनतेने केले. जनतेचा अपमान करण्याचा अधिकार आमदार अमोल मिटकरी यांना नाही. त्यांनी मर्यादेमध्ये राहून वक्तव्य करावे, अन्यथा भाजप त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देईल, असा इशारा देखील सोळंके यांनी दिला.

उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्र पाठवण्यामागे केवळ भाजपबद्दल (BJP) गैरसमज पसरवणे व भाजप नेत्यांबद्दल अपशब्द वापरणे हा एकमेव उद्योग आमदार अमोल मिटकरींचा (Amol Mitkari) आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी. महायुती धर्माचे पालन करावे, अशा तत्त्वांपासून सावध रहावे, असे विजयसिंह सोळंके यांनी अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT