<div class="paragraphs"><p>Sunil Mendhe- Parinay Fuke&nbsp;</p></div>

Sunil Mendhe- Parinay Fuke 

 

Sarkarnama  

विदर्भ

दोन मित्रांत दुरावा आणि भाजपाला जिल्ह्यात उतरती कळा?

Abhijeet Ghormare

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील भाजपमध्ये दोन नेत्यांमधील अंतर्गत मतभेदांमुळे दोन गट निर्माण झाले आहेत. यात एक गट भाजप खासदार सुनील मेंढे (Sunil Mendhe) यांचा तर दुसरा आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांचा आहे. सुनील मेंढे आणि परिणय फुके गट जिल्ह्यात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी एकमेकांच्या विरोधात काम करत असल्याने भंडारा जिल्ह्यात भाजपला (BJP) उतरती कळा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लवकरच यात लक्ष घ्यालण्याची गरज निर्माण झाली आहे.

पंतप्रधान मोदी ह्यांच्या कार्यप्रणालीला विरोध करत कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपला (BJP) रामराम ठोकला आणि पुन्हा कॉंग्रेसमध्ये घरवापसी केली. त्यानंतर भंडारा जिल्ह्यात भाजपाला मोठे नेतृत्व उरले नव्हते. त्यामुळे खासदार सुनील मेंढे व माजी मंत्री परिणय फुके यांच्यापैकी कोणी एकाने जिल्ह्यात भाजपचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा होती. मात्र दोघांमध्येही आपणच भाजपाचे नेतृत्व करत असल्याच्या चढाओढीत जिल्ह्यात भाजपमध्ये गटबाजी सुरु झाली. वरिष्ठ पातळीवरही नेतृत्व कोणाकडे आहे, हे स्पष्ट न झाल्याने वाद हा अधिकच टोकाला गेला. दोन्ही गटांत वर्चस्वाची लढाई सुरु झाली. या राजकीय लढाईमुळे एकेकाळचे पक्के मित्र आता आपसात एकमेकांचे कट्टर विरोधी झाले.

जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासून तर या दोन्ही गटांतील मतभेद अधिकच वाढले. जिल्हातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तिकीट वाटपातही हाच प्रकार दिसला. भंडारा जिल्ह्यात 21 डिसेंबर २०२१ रोजी 39 जिल्हा परिषद, 79 पंचायत समिति व 39 नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यात भाजपने प्रत्येक जागेवर स्वबळावर निवडणूक लढवली. या निवडणुकीसाठी भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरुन मोहाड़ी- तुमसर विधानसभा मतदारसंघाचे माजी भाजप आमदार चरण वाघमारे यांची जिल्हा परिषद निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सर्व राजकीय समीकरणे व पक्षीय बल लक्षात घेता त्यांच्या सल्ल्याने तिकीट वाटप होणे अपेक्षित होते. मात्र जिल्ह्यातील भाजपचे दोन गट कार्यरत असल्याने तुमसर तालुका वगळता इतर कोणत्याही तालुक्यात चरण वाघमारे यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले गेले.

दोन्हीही गटांतील नेत्यांनी कोणतेही निवडणूक समीकरण पडताळून न पाहता आपल्या मर्जीतील उमेदवारांना तिकीटे दिली. हीच संधी साधत भाजपच्या बंडखोरांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढविली. त्याचाच परिणाम जिल्ह्यातील निवडणूक निकालावर दिसून येणार आहे. तुमसर तालुका वगळता भंडारा जिल्ह्यातील इतर सहाही तालुक्यांत भाजप बंडखोरीला उधाण आले आहे. त्यामुळे येत्या 19 जानेवारीच्या मतमोजणीवर याचा परिणाम निश्चितच पहायला मिळणार आहे. सुनील मेंढे यांच्या भंडारा तालुक्यात याचा नकारात्मक परिणाम अधिक दिसून येणार आहे. त्यामुळे वेळीच भाजपच्या वरिष्ठांनी या नेत्यांमधील गटबाजीला आळा घातला नाही तर या जिल्ह्यांतून भाजपचा प्रभाव कमी झाल्याशिवाय राहणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT