Ajit Pawar and Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Buldhana Guardian Minister : ‘अजितास्त्राने’ भात्यात परतावून लावले बुलडाण्यातील शिंदे सेनेचे ‘बाण’

Atul Mehere

Buldhana District Political News : आदी अनंत काळापासून लढवय्या आणि युद्धात निपुण असलेल्यांची जात म्हणून भिल्ल ओळखले जातात. भिल्लांचे वास्तव्यस्थान असल्याने एकेकाळी भिलठाणा नाव असलेल्या व आत्ताचे बुलडाणा म्हणून सर्वांना परिचित असलेल्या डोंगरावरच्या या गावातील राजकीय शीतयुद्धात राष्ट्रवादी काँग्रेसने ‘अजितास्त्रा’चा वापर करीत शिंदे सेनेतील सर्व लढवय्यांचे ‘बाण’ भात्यात परतावून लावले आहेत. (The victory banner hoisted in the cold war in the village of 'Bhillas')

रामायण, महाभारत काळातील युद्धादरम्यान एखाद्या योद्ध्याने प्रतिस्पर्धी सेनेवर एखादे अस्त्र सोडले की, त्याचे प्रत्युत्तर समोरच्या सेनेतील योद्धा त्याहीपेक्षा जास्त शक्तिशाली अस्त्र सोडून द्यायचा. असा प्रसंग रामायण, महाभारताच्या ग्रंथात अनेकांनी वाचला असेल किंवा टीव्हीवरील मालिकांमध्ये पाहिला असेल. बुलडाण्यात गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्रिपदावरून असेच शीतयुद्ध सुरू होते.

शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पदासाठी रस्सीखेच करीत होती. अखेर घाटांनी वेढलेल्या बुलडाण्यातील शिंदे सेनेला राष्ट्रवादीने खिंडीत पकडले व त्यांच्याजवळ असलेले सर्वांत शक्तिशाली ‘अजितास्त्र’ चालवीत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या शीतयुद्धात विजयपताका फडकविली. अजित पवार आपल्या सहकाऱ्यांसह सत्तेत सहभागी झाल्यानंतर मंत्रिमंडळातील खातेवाटप, पालकमंत्री पदं यावरून खल सुरू होता.

कोणतं खातं कोणत्या पक्षाकडे असावं, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पक्षाचा पालकमंत्री असावा, यावरून आधीच बोलणी झाली होती. परंतु त्याला विलंब झाल्याने राजी-नाराजी नाट्य सुरू होते. काही झालं तरी अजितदादांना पुण्याचे पालकमंत्रिपद लागेलच, हे ते सत्तेत सहभागी झाले तेव्हाच अधोरेखित झालं होतं, पण विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे सेना आणि पवार गटात शीतयुद्ध सुरू होते.

राष्ट्रवादी अर्थात अजित पवार निधी वाटप करताना अन्याय करतात, कामं करताना डावलतात, काही झालं तरी राष्ट्रवादी नकोच असा शिंदे सेनेचा आरोप होता. त्यातही बुलडाण्यात प्राबल्य असल्याने पालकमंत्रिपद शिंदे सेनेलाच मिळावे, यासाठी सर्वच नेत्यांनी ‘धनुष्या’ला ‘बाण’ लावले होते. खासदार प्रतापराव जाधव, शिंदेंचे निकटवर्तीय बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड, मेहकरचे आमदार संजय रायमूलकर यांनी, तर काही झाले तरी राष्ट्रवादीचा पालकमंत्री होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिकाच घेतली होती.

बदलापूर्वीपर्यंत बुलडाण्याचे पालकमंत्रिपद शिंदे सेनेचे आक्रमक नेते गुलाबराव पाटील यांच्याकडे होते. मात्र, जळगाव खानदेशातून ते बुलडाण्याकडे येणारा ‘घाट’ कधी चढलेच नाहीत. ‘झेंडा टू झेंडा’ जिल्ह्यात पालकमंत्री हमखास दिसतात. हे सूत्रदेखील पाटील यांच्या बाबतीत लागू पडले नाही.

परिणामी राज्य सरकारने अनिल पाटील यांना ध्वजारोहणासाठी पाठविले. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत शिंदे सेना युद्धाचे मैदान लढवत राहिली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने सध्या त्यांच्या भरवशावर असलेल्या ‘धनुष्याची’ प्रत्यंचा अशी काही ओढली की, बुलडाण्याचे पालकमंत्रिपद त्यांच्याकडे आले.

आक्रमक नेता नको, अशी शिंदे सेनेची मागणी होती. त्यामुळे त्यातल्या त्यात सुवर्णमध्य मार्ग काढत शिंदे, फडणवीस आणि पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर ही धुरा सोपविली. राष्ट्रवादीतील सर्व नेत्यांपैकी वळसे पाटील यांची प्रतिमा मवाळ आहे. खुद्द एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनीही अनेकदा वळसे पाटील यांची विधिमंडळात तोंडभरून स्तुती केली आहे.

त्यामुळे पदाच्या वादाला बुलडाण्यात वेगळा ‘वळसा’ लागू नये, म्हणून तिन्ही नेत्यांनी सामंजस्याने पाटील यांच्या नावाला पसंती दिली. दिलीप वळसे पाटील यांच्या नियुक्तीमुळे दादांच्या गटात असलेले माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनाही आता बळ मिळणार असल्याचे सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT