Mumbai News : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराप्रमाणे पालकमंत्री पदाचाही विस्तार तथा फेरबदल हा मोठ्या प्रतीक्षेनंतर सरतेशेवटी झाला. १२ जिल्ह्यांत हा खांदेपालट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केला. त्यात पुण्याचे पालकमंत्रिपद पुन्हा मिळवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाजी मारली. तसेच छगन भुजबळांचा अपवाद सोडता आपल्या इतर समर्थक कॅबिनेट मंत्र्यांनाही त्यांनी हे मानाचे पद मिळवून दिले.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मंगळवारी अचानक दिल्लीवारी, अजित पवारांची (Ajit Pawar) कॅबिनेट मीटिंगला गैरहजेरी याच्या पार्श्वभूमीवर लगेच आज पालकमंत्री फेरबदल झाला, हे ध्यानात घेतले पाहिजे. त्यातून राज्यातील अस्थिर राजकीय वातावरण काहीसे स्थिर होण्यास मदत होईल, असे बोलले जात आहे. प्रत्यक्षात त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांत धुसफूस वाढण्याची शक्यता आहे.
या फेरबदलात राज्य सरकारात नव्याने सामील झालेल्या अजितदादा गटाचे प्राबल्य असल्याचे दिसून आले आहे. त्यांचे खंदे समर्थक धनजंय मुंडेंना त्यांनी त्यांच्याच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले, हे खूप काही सांगून जात आहे. त्यामागे स्थानिक कुरघोडीचे राजकारण दडलेले आहे. त्यांचे दुसरे मंत्री आणि शरद पवार यांचे एकेकाळचे उजवे हात दिलीप वळसे-पाटील यांना त्यांनी बुलडाण्याचे पालकमंत्रिपद दिले आहे.
भाजपचे (BJP) नगरचे राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही स्थानिक जिल्हा न देता त्यांच्याकडे अकोला जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंड करून अजितदादा दोन जुलैला भाजप आणि शिवसेनेच्या (शिंदे) राज्य सरकारमध्ये सामील झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हापासून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तेच होणार, अशी चर्चा सुरू झाली होती. एवढेच नाही, तर १५ ऑगस्टला पुण्यात ते झेंडावंदन करणार असेही म्हटले गेले. पण प्रथेप्रमाणे ते राज्यपालांनी केले.
मात्र, पालकमंत्री ते आज झाल्याने प्रजासत्ताकदिनी ते पुण्यात झेंडावंदन करतील. तसेच त्यामुळे त्यांच्या पिंपरी-चिंचवड, पुणे (Pune) शहर आणि जिल्ह्यातीलही समर्थकांना आता आणखी बळ मिळाले आहे. आगामी लोकसभा निवडणूक ध्यानात घेऊन भाजपने ही तडजोड आणि मोर्चेबांधणी केल्याचे दिसून आले आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.