Prataprao Jadhav Vs Narendra Khedekar Vs Ravikant Tupkar Sarkarnama
विदर्भ

Buldhana Lok Sabha Constituency: शिवसैनिकच जिंकणार बुलडाणा की तुपकरांचा चालणार 'पाना'?

Jagdish Patil

Buldhana Lok Sabha Election Result 2024: शिवसेनेत झालेल्या एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी लढत होत आहे. यामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. या मतदारसंघात महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाने नरेंद्र खेडेकर यांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे आघाडी असो वा युती कोणाचाही उमेदवार विजयी झाला तरी हा मतदारसंघ शिवसेनेचा गड कायम राहील यात शंका नाही.

सन 1995 पासून शिवसेनेला विदर्भात उभारी मिळाली. मुंबई बॉम्बस्फोटानंतर राज्यात हिंदुत्वाचे वारे वाहू लागले. 1995 मध्ये राज्यात सेना-भाजप युतीचं सरकार सत्तेत आलं. केंद्रातही 1996 साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात एनडीएची सत्ता आली. यावेळी युतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला. 1996 मध्ये आनंदराव अडसूळ या मतदारसंघातून खासदार झाले. तर 1998 मध्ये काँग्रेसचे मुकुल वासनिक निवडून आले होते. पण, 1999 पासून पुन्हा सलग शिवसेनेचा उमेदवार या मतदारसंघातून निवडून येत आहे.

मात्र, यंदाच्या लोकसभेचं चित्र वेगळं आहे. शिवसेनेतील (Shivsena) फूटीमुळे आता दोन शिवसेना मैदानात उतरल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीला ‘निष्ठावंत विरुद्ध गद्दार’ या अंगाने पाहिलं जात आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र खेडेकर आणि शिंदेसेनेचे प्रतापराव जाधव यांच्यात हा सामना रंगला आहे. तर रविकांत तुपकरांनी या निवडणुत उडी घेतल्याने हा सामना चुरशीचा होणार आहे. शिवाय तुपकर आघाडीची मते खाणार की महायुतीची यावर इथल्या निवडणुकीचं गणित अवलंबून आहे.

काहीही झालं तरी बुलडाणा मतदारसंघ सेनेचाच...

मागील 25 वर्षांपासून बुलडाणा मतदारसंघावर शिवसेनाचा भगवा फडकत आहे. आनंदराव अडसूळ सलग दोन तर प्रतापराव जाधव तीनवेळा इथून विजयी झाले आहेत. 2024 मध्येही शिवसेनाच बाजी मारणार हे नक्की असले तरी मतदार ठाकरेंच्या नेतृत्‍वातील शिवसेनेला की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला निवडून देणार याचं चित्र उद्या स्पष्ट होणार आहे. मात्र, काहीही झालं तरी बुलडाणा मतदारसंघ शिवसेनेचाच राहील यात काही शंका नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT