Buldhana Municipal Election : बुलढाणा नगरपालिका निवडणुकीच्या आजच्या मतदानावेळी एकनाथ शिंदे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये हाय होल्टेज ड्रामा रंगला. आमदार संजय गायकवाड यांनी बोगस मतदार आणल्याचा आरोप काँग्रेसने केला. या मतदारांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडल्यानंतर एकच राडा झाला.
या बोगस मतदारांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर, यात आमदार गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनी हस्तक्षेप केला. पोलिसांना शिवीगाळ अन् दमदाटी करत, या बोगस मतदारांना पळवून लावले. या राड्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आक्रमक झाले असून, निवडणूक आयोग आणि पोलिस यंत्रणेने कायदेशीर कारवाई करावी, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
बुलढाणा पालिकेच्या निवडणुकीत आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad), माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे आणि माजी आमदार तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यातच गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड, शिंदे यांच्या पत्नी अर्पिता शिंदे अध्यक्ष पदाची निवडणूक लढवीत आहे. यामुळे बुलढाण्यात हाय होल्टेज ड्रामा रंगला आहे.
मतदानाला (Voter) काही तास उलटत नाही, तोच बोगस मतदानाला सुरुवात झाली. एका मतदान केंद्रावर वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर मोताळा तालुक्यातील एकाने बोगस मतदान केले. याला थेट उमेदवाराने मतदानानंतर पकडले. त्याच्यासोबत आणखी एक युवक सापडला.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील कोथळी, इब्राहिमपूर इथून काही लोक बोगस मतदानासाठी आणण्यात आले. घाटा खालून जवळपास दोन गाड्या भरून बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आणले गेले आहेत. त्यामुळे पोलिस व निवडणूक प्रशासनाने निवडणूक अधिक दक्षता घेण्याची मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली होती. बोगस मतदानाला पुष्टी देणारे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर बुलढाणा नगरपालिकेतील बोगस मतदानावर लागोपाठ पोस्ट शेअर केल्या. बुलढाण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ग्रामीण भागातून लोकांना आणून नगरपालिका निवडणुकीत बोगस मतदान करून घेत असल्याचा गंभीर आरोप केला.
काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते या बोगस मतदारांना पकडून पोलिसांच्या हवाली करत असताना, आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड याने पोलिसाला शिवीगाळ आणि दमदाटी करून बोगस मतदाराला पळवून लावल्याचा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. या प्रकरणी कुणाल गायकवाड याच्याविरोधात बोगस मतदान आणि सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी, अशीही मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
सकाळी मुलगा अन् दुपारी पीए ! नगराध्यक्ष पद तर दूरच, प्रभाग क्रमांक सहा मध्येही मुलगा नगरसेवक पदी निवडून येत नाही! हे समजल्यावर आता निराशा स्पष्ट दिसून येत आहे. बोगस मतदान पकडल्यावर PAने हतबलतेने काढता पाय घेतला, तर बोगस मतदाराने धनुष्यबाणाला मतदान केल्याचे सांगितल्यावर उपस्थितांनी चोप दिला. पोलिस कठोर कारवाई ऐवजी भांडण सोडवत आहेत, तर नागरिक गुंडागर्दीला चिरडून काढत असल्याचा टोला देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.