Sanjay Kute Sarkarnama
विदर्भ

Buldhana Sanjay Kute Politics : खासदारांसमोर घडलेल्या मानापमान नाट्यानंतर भडकले आमदार कुटे !

जयेश विनायकराव गावंडे

Buldhana Sanjay Kute Politics : संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील आयोजित एका कार्यक्रमात महिला सरपंच आणि जळगाव जामोदचे भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्यातील मानापमान नाट्य चांगलेच रंगले. कोणत्याही गावात कार्यक्रम होत असताना तेथील प्रथम नागरिकाचे नाव निमंत्रण पत्रिका, कामाशी संबंधित पाट्यांवर टाकले जाते, परंतु वरवट बकाल येथील कार्यक्रमादरम्यान या परंपरेला फाटा देण्यात आला.

खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय कुटे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमात आपले नाव नसल्याने साहजिकच वरवट बकालच्या महिला सरपंचाने भाषणादरम्यान नाराजी व्यक्त केली. सरपंचाने आपल्या भाषणादरम्यान आपल्या जातीचा उल्लेख केल्यानंतर आमदार कुटे भर कार्यक्रमात महिला सरपंचावर संतापले. आमदारांचा संताप आणि आपले नाव नसल्यामुळे झालेला अपमान पाहता वरवट बकालच्या महिला सरपंच व्यथित झाल्या. अशात त्यांनी भर कार्यक्रमातून बाहेर पडणे पसंत केले.

हे सर्व मानापमान नाट्य सुरू असतानाच आमदार कुटे यांनी माइक हाती घेतला. खासदार आणि आमदार निधीतून अनेक दलित वस्त्यांमध्ये कामे झालेली आहेत. त्यामुळे केवळ जातीचा उल्लेख करीत समाजात विष पेरण्याचे काम बंद करावे, असे कुटे म्हणाले. विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर होत असताना अशी कारणे पुढे करीत राजकारण करणे चुकीचे असल्याचे आमदार कुटे यांनी नमूद केले. मात्र, या सर्व प्रकारामुळे वरवट बकालच्या सरपंच चांगल्याच संतापल्या.

नाव अपेक्षित होते काय?

कोणत्याही भूमिपूजन, लोकार्पण आदी कार्यक्रमामध्ये संबंधित गाव, शहर किंवा महानगरातील प्रथम नागरिकाचे नाव घेतले जाते. महानगरपालिका असेल तर प्रथम नागरिक म्हणून महापौरांचे, नगरपरिषद क्षेत्रात नगराध्यक्षांचे, जिल्हा परिषद, पंचायत समिती क्षेत्रात जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापतींचे नाव घेण्यात येते. ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या कामांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, संबंधित पंचायत समिती सभापती आणि ग्रामपंचायत सरपंचानेही नाव असते.

वरवट बकाल येथील कार्यक्रमात गावातील सरपंचाचे नाव नमूद करण्यात न आल्याने मानापमान नाट्य घडले आहे. सरपंचाने नाव न घेण्याची सूचना आमदारांनी केली होती की, कार्यक्रमाच्या आयोजकांनी परस्पर आपल्या मनाने हा कारभार केला, याची चौकशी या घटनेमुळे नितांत गरजेची झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महिला सरपंचाचे नाव आयोजकांनी परस्पर कोणालाही विचारात न घेता काढले असेल, तर हा प्रकार गंभीर आहे. परंतु आमदारांनी यासंदर्भात सूचना दिल्या असतील तर बुलडाण्याच्या राजकारणात नवीन वादाला तोंड फुटले आहे, हे मात्र निश्चित.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT