Buldhana political news : बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात महायुतीतील स्थानिक वर्चस्वाचा संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.
चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले आणि बुलढाण्याचे एकनाथ शिंदे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यातील राजकीय मतभेद अधूनमधून उघडपणे समोर येत असतानाच, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी चिखलीतील दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव आणि श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांना दिलेली ‘जादू की झप्पी’ चर्चेचा विषय ठरली आहे.
काही दिवसांपूर्वी संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आमदार श्वेता महाले यांच्या चिखली विधानसभा मतदारसंघात मुलगा कुणाल गायकवाड यांचा वाढदिवस साजरा केला होता. या कार्यक्रमात गायकवाड यांनी ‘आग्यामोहोळ’ उठविण्याची भाषा करत महाले गटाच्या राजकीय प्रभावाला थेट आव्हान दिल्याची चर्चा झाली. राजकीयदृष्ट्या महाले यांचा प्रभाव असलेल्या चिखलीत गायकवाड यांनी केलेली ही राजकीय सक्रियता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाले गटानेही बुलढाण्यात राजकीय ताकद दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र आहे.
आमदार श्वेता महाले यांच्याकडूनही संघटनात्मक पातळीवर आक्रमक हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे. महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा शहरांमध्ये मोठे राजकीय शक्ती प्रदर्शन करण्यात आले. या शक्ती प्रदर्शनात आमदार महाले यांनी बाप तो बाप रहेगा या गाण्यावरून आणि धनुष्यबाणाचा इशारा करत आमदार गायकवाड यांना डिवचल्याचे दिसून आले होते.
अशातच केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी भर मंचावर विद्याधर महाले यांना दिलेली ‘जादू की झप्पी’ या संपूर्ण घडामोडीतील सर्वाधिक चर्चेचा क्षण ठरला. जाधव हे बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणातील अनुभवी नेते असल्याने त्यांच्या या सार्वजनिक जवळीकीकडे राजकीय संकेत म्हणून पाहिले जात आहे. मात्र, या भेटीमागे कोणतेही विशिष्ट राजकीय समीकरण असल्याचे जाधव किंवा महाले यांच्याकडून अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही.
भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना हे राज्यात महायुतीचे घटक पक्ष आहेत. त्यामुळे सार्वजनिक व्यासपीठांवर एकजुटीचा संदेश दिला जात असला, तरी बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक राजकीय प्रभाव वाढविण्यासाठी नेत्यांमध्ये स्पर्धा असल्याचे चित्र विविध घडामोडींमधून समोर येत आहे.
एकीकडे संजय गायकवाड यांची चिखलीतील राजकीय सक्रियता, तर दुसरीकडे महाले गटाची बुलढाण्यातील उपस्थिती आणि आता प्रतापराव जाधव यांची विद्याधर महाले यांच्याशी झालेली जवळीक, या घडामोडींमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे ‘जादू की झप्पी’ ही केवळ राजकीय आपुलकी होती की त्यामागे भविष्यातील राजकीय समीकरणांची चाहूल आहे, याचे उत्तर आगामी काळातील घडामोडींमधूनच स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.