Chandrapur BJP Politics - भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यात जिल्हाध्यक्षांच्या निवडीवरून चांगलाच वाद रंगला होता. याच कारणामुळे अनेक दिवस हा विषय भाजपने पेंडिंग ठेवला होता. त्यानंतर शहरात जोरगेवार आणि ग्रामीणमध्ये मुगंटीवार यांच्या पसंतीचा अध्यक्ष देऊन या शीतयुद्धाला भाजपने अर्धविराम दिला होता. आता शहरातील मंडळ अध्यक्षांच्या सर्वच्या सर्व नियुक्त्या जोरगेवार संमतीने करून एकप्रकारे मुनगंटीवारांना शहरात एकप्रकेर नो एंट्री केल्याचेच दिसत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या या दोन्ही नेत्यांमधील वाद चांगलाच विकोपाला गेल्याचे दिसून आले आहे. प्राप्त माहितीनुसार विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जोरगेवार यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये यासाठी मुनगंटीवारांनी दिल्लीही गाठली होती. मात्र पक्षाने त्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष केले आणि जोरगेवारांना प्रवेशासोबतच त्यांच्या हाती पक्षाचा एबी फॉर्मसुद्धा दिला होता. तेव्हाच या संघर्षाची बिजे रोवली गेली होती. जोरगेवार मोठ्या मताने निवडून आले. त्यानंतर मुनगंटीवारांना धक्के बसणे सुरू झाले. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात पहिल्या पाचमध्ये सुधीर मुनगंटीवार राहतील अशी सर्वांची अपेक्षा होती.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे अर्थमंत्री, वनमंत्री व सांस्कृतिकमंत्री अशी विविध पदे त्यांनी यापूर्वी भूषणवली होती. मंत्रिमंडळाच्या संभाव्य यादीत त्यांचे नाव होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीसुद्धा त्यांना तशीच माहिती पुरवली होती. मात्र नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि भाजपने आपल्या मंत्र्यांची नावे जाहीर केली तेव्हा मुनगंटीवारांना जबरदस्त धक्का बसला. चंद्रपूरमधून एकाही नेत्याचे नाव या यादीत आले नाही. मुनगंटीवार यांनी या दरम्यान जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली, हिवाळी अधिवेशनाला दांडी मारली मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी त्यांना मोठे पद देऊ असे सांगितले होते. मात्र यास सहा महिने उलटले आहेत. मंत्रिपदापेक्षा मोठे पद मिळाले नाहीच दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यावरची त्यांची पकडही सैल करणे सुरू केले असल्याचे दिसून येते.
शहरात मुनगंटीवार यांचा पसंतीचा अध्यक्षाच्या नावावर पक्षाने फुली मारली होती. त्यानंतर किमान आपल्या समर्थकांना मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त केले जातील ही त्यांची आशाही आता मावळली आहे. भाजपने मंडळ अध्यक्षांची नावे जाहीर केली आहेत. यात त्यांना हवा असलेला एकहीजण नसल्याचे बोलले जात आहे. तर मुनगंटीवारांचा मतदारसंघ राजुरा आहे. त्यांचे कार्यक्षेत्र ग्रामीण असल्याने शहरात जोरगेवार समर्थकांना स्थान देण्यात आले अशी सारवासारव भाजपच्यावतीने केली जात आहे. मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्यांमध्ये तुकूम मंडळात सुभाष आदमने, सिव्हिल लाईन मंडळ रवी जोगी, बाबुपेठ मंडळ प्रदीम किरमे, बंगाली कॅम्प सारिका संदूरकर यांच समावेश आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.