Sudhir Mungantiwar and Kishor Jorgewar Sarkarnama
विदर्भ

Chandrapur News : फडणवीस, जोरगेवार अन् अहिरांची एकत्रित खेळी; 'मुनगंटीवारांना' चेपवायचचं ठरवलंय!

Sudhir Mungatiwar News : भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कुरघोडी करण्याचे, त्यांचे राजकीय वजन कमी करण्याचे चहुबाजूंनी प्रयत्न सुरु आहेत.

Hrishikesh Nalagune

Sudhir Mungatiwar News : भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कुरघोडी करण्याचे, त्यांचे राजकीय वजन कमी करण्याचे चहुबाजूंनी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते मुनगंटीवार यांचे कट्टर विरोधक आणि स्थानिक आमदार किशोर जोरगेवार, माजी मंत्री हंसराज अहिर असे नेते मंडळी एकत्र आली. पण मुनगंटीवार काही हाताला लागेनात, असे चित्र बघायला मिळत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसला कुरघोडीची परंपरा आहे. इथले नेते उघडपणे एकमेकांवर आरोप करीत असतात. विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर आणि विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी ही परंपरा आजदेखील जपली आहे. त्यातुलनेत भाजप शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जातो. या पक्षातही कुरघोडी आहे. पण ती कधीही उघड झाली नाही.

मात्र, विधानसभा निवडणुकीपासून भाजपमधील कुरघोडी उघडपणे समोर आली आहे. पक्षाचा आदेश शिर्षस्थानी असतो. वरिष्ठ नेत्याला सन्मान मिळायलाच हवा. एकमेकांविषयीच्या तक्रारी, नाराजी उघडपणे बोलायची नाही, हा या पक्षातील नियम आहे. परंतु मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील भाजपच्या काही नेत्यांकडून हा नियम पायदळी तुडवला जात आहे.

चंद्रपूर जिल्हा भाजपवर आधी सुधीर मुनगंटीवार यांचे एकहाती वर्चस्व होते. मुनगंटीवार यांनी अगदी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या कार्यकर्त्यांना कधीही मुख्य प्रवाहात स्थान दिले नव्हते. इतकेच काय 2019 मध्ये अहिर यांचा लोकसभेला पराभव झाला तेव्हाही मुनगंटीवार यांच्याच विधानसभा मतदारसंघातूनच ते पिछाडीवर होते. पण उघडपणे नाराजी व्यक्त न करण्याचा नियम पाळून अहिर गप्प राहिले.

पण विधानसभा निवडणुकीपूर्वी किशोर जोरगेवार यांची भाजपमध्ये घरवापसी झाली. या घरवापसीला मुनगंटीवार यांचा विरोधच होता. तो त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवला होता. अनेक दिवस जोरगेवार यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडत होता. पण अखेर विरोध डावलून जोरगेवार यांना पक्षात घेण्यात आले. इथेच मुनगंटीवार यांना पहिला धक्का बसला.

राज्यात सरकार स्थापनेवेळी मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात आला. तिथे त्यांचे दुसऱ्यांदा खच्चीकरण झाले. दुसऱ्या बाजूला चंद्रपूरमध्ये जोरगेवार यांनी मुनगंटीवारांच्या विरोधात मोट बांधणी सुरू केली. अहीर यांनाही जुने उट्टे काढण्याची संधी मिळाली. मग किशोर जोरगेवार, देवेंद्र फडणवीस, अहीर यांनी एकत्रित येत मुनगंटीवारांविरोधात मोर्चा उघडला.

मुनगंटीवार यांचा जिल्ह्यावरील प्रभाव संपवायचाच या हेतून जोरगेवार काम करत आहेत. मुनगंटीवार यांना महानगर अध्यक्ष त्यांच्या ऐकण्यातील हवा आहे. पण त्यापूर्वी मंडळ अध्यक्षांची नेमणूक करायची आहे. यासाठी गेल्या महिन्यापासून जोरगेवार आणि मुनगंटीवार यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. आमदार किशोर जोरगेवार आणि माजी आमदार संजय धोटे यांनी आक्षेप घेत या नियुक्त्या रखडवल्या आहेत.

प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या डेडलाईनमध्ये देखील या नियुक्त्या होऊ शकल्या नव्हत्या. अद्यापही चंद्रपूर शहर आणि राजूरा विधानसभा क्षेत्रातील मंडळ अध्यक्षांची नेमणूक होऊ शकलेली नाही. या त्रिकुटाला वरोराचे आमदार करण देवतळे आणि चिमूरचे आमदार बंटी भांगडिया हेसुद्धा साथी हाथ बढाना म्हणत सहकार्यासाठी तयार आहेत.

त्यामुळे मागील काही महिन्यांत मुनगंटीवार जोरगेवार यांच्यातील कुरघोडी आता उघडपणे दिसून येत आहे. या दोन्ही नेत्यांचे समर्थक सोशल मीडियावर टीका करण्याची संधी सोडत नाही. त्यामुळे काँग्रेसचे झालेले पानिपत डोळ्यासमोर असताना भाजपमध्ये आता उघडपणे सुरू असलेली कुरघोडी या पक्षाला कोणत्या स्तरावर घेऊन जाईल, हे येणारा काळच सांगेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT