Karanji Grampanchayat Office Sarkarnama
विदर्भ

Chandrapur District News : सरपंच म्हणाल्या, यायचेच नव्हते, तर मग कशाला मारल्या सह्या !

संदीप रायपूरे

Chandrapur Political News : ग्रामपंचायतीच्या उपसरपंच वर्षभरापासून गावात राहत नाहीत म्हणून सभागृहात मुद्दा उपस्थित झाला. ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी एकमताने अविश्वास ठराव आणायचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर प्रशासकीय कार्यवाहीसाठी सह्यांचे पत्रही दिले; पण अविश्वास ठरावाच्या अंमलबजावणीची वेळ आली, तेव्हा सह्या मारणारे सदस्य गायब होते. (When it came time for execution, the signing members disappeared)

अविश्वास आणायचाच नव्हता, तर सह्या मारल्याच कशाला, असा प्रश्‍न उपस्थित करत करंजीच्या सरपंच सरिता पेटकर यांनी ग्रामपंचायत सदस्यांवर निशाणा साधला आहे. आपण काँग्रेसच्या असून, उगीचच कुणीतरी बदनामीचा प्रयत्न करू नये, असा इशाराही पेटकरांनी दिला आहे. गावातील राजकारण म्हणजे लईच भारी कोण, कधी, कसा, कुणाचा गेम करेल, याचा काही नेम नसतो.

चंद्रपूर जिल्ह्यातील करंजी गावात घडलेल्या या घटनेने सध्या चर्चांना उधाण आले आहे. उपसरपंच जयश्री भडके या वर्षभरापासून अनुपस्थित होत्या. त्या दुसऱ्या गावाला राहतात. नोटीस बजावूनही काही फायदा झाला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी मिळून उपसरपंचावर अविश्वास प्रस्ताव आणण्याचे ठरविले. ठरावावर सदस्यांनी सह्या मारल्या व पुढील कार्यवाहीसाठी प्रशासनाला पत्र दिले. अविश्वासाची तारीख आली.

अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी दाखल झाले, पण या वेळी सरपंच सरिता पेटकर व सदस्य समीर निमगडे हे दोघेच उपस्थित होते. उर्वरित सदस्य अनुपस्थित राहिले. यामुळे उपसरपंचावरील अविश्वास प्रस्ताव आपोआपच बारगळला. दरम्यान, समीर निमगडे हे भाजप समर्थित असल्याने त्यांना कुठल्याही परिस्थितीत उपसरपंच होऊ द्यायचे नाही, यासाठी सदस्य गायब असल्याच्या चर्चा होत्या.

आता या प्रकरणी सरपंच पेटकर यांनी अनुपस्थित असलेल्या सदस्यांवर निशाणा साधला आहे. अविश्वास ठराव आणायचा नव्हता, तर मग उगाचच ठरावास संमती देऊन स्वाक्षऱ्या मारून अनुपस्थित राहून प्रशासनाची दिशाभूल का केली, असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. ११ सदस्यीय असलेल्या करंजी ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसची सत्ता आहे. अविश्वासाच्या वेळी जे सदस्य अनुपस्थित राहिले. त्यातील अनेकांना उपसरपंच व्हायचे होते.

उपसरपंचांची खुर्ची पुन्हा रिकामी...

पण पद एक अन् उमेदवार अनेक, अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे आम्ही नाही तर कुणीच उपसरपंच नाही, ही भूमिका घेऊन अविश्वासाच्या वेळी सदस्यांनी अनुपस्थित राहिल्याची चर्चा आहे. दरम्यान, उपसरपंच जयश्री पेटकर यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव बारगळल्याने पुढील दोन वर्षांपर्यंत पुन्हा त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही. त्यामुळे वर्षभरापासून रिकामी असलेली उपसरपंचाची खुर्ची पुन्हा रिकामीच राहणार आहे.

करंजी हे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं जन्मगाव आहे. वडेट्टीवारांच्या या गावात नेहमीच राजकीय उलथापालथ होत असतात. करंजीत उपसरपंचपदावरून सुरू असलेली चर्चा थांबायचे नाव घेत नाही. दरम्यान, अविश्वास आणून आपल्या हाती उपसरपंचपदाची सूत्र घेऊन ग्रामपंचायतीवर कब्जा मिळविण्याची ‘त्या’ एका सदस्याची संधी हुकली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT