Chandrapur Politics : निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारकडून महापदभरती काढली जात आहे.अ नेक विभागाच्या परीक्षाही झाल्या. यानंतरही अनेक परीक्षा होणे बाकी आहेत. याचदरम्यान राज्य सरकारने शासकीय नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला. जळगाव जिल्हा प्रशासनाने तर कंत्राटी पदाची जाहिरातही काढली. यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला. संतापलेल्या चंद्रपुरातील विद्यार्थ्यांनी सरकारने निर्णय घेतला, आता आमच्यावर अभ्यास करणे सोडून, रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
शासनाने शासकीय नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने भरण्याचा घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय करणारा आहे. शासनाने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आम्हाला अभ्यास करण्याचे सोडून रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असा इशारा गोंडपिपरी येथील दीपस्तंभ अभ्यासिकेचे अध्यक्ष अंकेश झाडे यांनी दिला आहे. (Vidarbha News)
उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी स्पर्धा परीक्षांकडे तरुणाई मोठ्या अपेक्षेने राज्य सरकारकडे बघत आहे. चार हजार तलाठी पदांकरिता दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले. यावरूनच शासकीय नोकरी मिळविण्यासाठी असलेल्या भयानक स्पर्धेंच दर्शन झाले. लोकसभा विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. याचवेळी दहा वर्षांनंतर शासनाने विविध पदांची मेगाभरती काढली. या स्पर्धा परीक्षांत यश मिळविण्यासाठी तरुणाई जिवाचे रान करीत आहे. (Students News)
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी असलेल्या अभ्यासिका फुल्ल आहेत. एकीकडे शासन विविध पदांच्या जाहिराती काढत आहे, पण दुसरीकडे शासनाने यापुढे शासकीय नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला. आता या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी दिसून आली. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदार, नायब तहसीलदार, कनिष्ठ लिपिकाच्या कंत्राटी पद्धतीने जाहिरात काढली. ही जाहिरात समाजमाध्यमातून समोर येताच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांमध्ये संतापाचे वातावरण असून, त्यांनी या निर्णयाचा कडाडून विरोध केला. परीक्षा सुरू असताना हा निर्णय आल्याने आम्हाला अभ्यास सोडून, आता रस्त्यावर उतरावे लागेल का, असा गंभीर इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
शासकीय नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय सरकारचे मनसुबे काय आहेत, हे स्पष्ट करणारा आहे. या निर्णयाने विद्यार्थ्यांचे मनोबल कमालीचे खचले आहे. यामुळे या निर्णयाविरोधात विविध माध्यमांतून ते संताप व्यक्त करीत आहेत. या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असं म्हणत त्यांनी सरकारच्या धोरणाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
स्पर्धा परीक्षांकरिता आधी दोन-तीनशे रुपये फी असायची.आता शासनाने सरसकट यात तीन पटीने वाढ केली आहे. मागासवर्गीयांसाठी नऊशे रुपये, तर सर्वसाधारण गटासाठी एक हजार रुपये फी आहे. परीक्षा फी वाढल्याने अनेकांना परीक्षापासून वंचित राहावे लागते. आधी फी वाढविली अन् आता कंत्राटीचा निर्णय, या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर बराच परिणाम झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.