sudhir mungantiwar, chandrapur morcha Sarkarnama
विदर्भ

Chandrapur Morcha News : बहुजनांची पोरं शिकू लागली, सरकार शाळा विकू लागली...; मुनगंटीवारांचं घर येताच तुफान घोषणाबाजी

Chandrapur Morcha Slogans Near Mungantiwar House : राज्य सरकारच्या धोरणांविरोधात मोर्चा काढत तरुण आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

संदीप रायपुरे - Sarkarnama

Chandrapur News : राज्य सरकार शाळांचे खासगीकरण करू पाहात आहे. कंत्राटी व्यवस्था निर्माण करून बहुजन समाजाला दडपून टाकण्याचे काम राज्य सरकारकडून होत आहे. परीक्षा फी वाढवून अभ्यास करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांची स्वप्नं धुळीस मिळवत आहे. बहुजनांची पोरं शिकू लागली अन् सरकार शाळा विकू लागली, असा नारा देत आज हजारोच्या संख्येत तरुणाई चंद्रपूरच्या रस्त्यावर उतरली. या वेळी सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध करून आंदोलनकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

चंद्रपुरात बेरोजगार तरुणांनी व नागरिकांनी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होत सरकारविरोधी आवाज बुलंद केला. गेल्या काही दिवसांत शासनाने विविध पदांची भरती काढली. यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांत उत्साह निर्माण झाला होता, पण परीक्षा फी सरसकट हजार रुपये केल्याने त्यांच्यात प्रचंड नाराजी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकीकडे पदभरती काढल्यानंतर दुसरीकडे यापुढील शासकीय भरती कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. यानंतर शासकीय शाळांचे खासगीकरण करण्याच्या दृष्टीने सरकारची वाटचाल सुरू आहे. यामुळे तरुण आणि नोकरदारांमध्ये मोठा संताप आहे. चंद्रपुरात याविरोधात आज हजारोंच्या संख्येत नागरिकांनी एकत्र येत एल्गार पुकारला.

चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवरून या आक्रोश मोर्चाची सुरुवात झाली. शहरातील मुख्य मार्गावरून हा हजारोंचा मोर्चा काढण्यात आला. बेरोजगारी का शोर है चौकीदारही चोर है, सरकार तुपाशी बेरोजगार उपाशी, बहुजनांची पोरं शिकू लागली, सरकार शाळा विकू लागली, डिग्री विकणे आहे, आम्ही म्हणतो पुस्तकं वाचा, सरकार म्हणते डीजेवर नाचा, असे नारे देत आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध केला.

आंदोलनकर्त्यांचा मोर्चा तिथे पोहोचताच...

मुख्य मार्गावरून हजारो आंदोलनकर्ते समोर जात होते. चंद्रपूरचे पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कस्तुरबा चौकात घर आहे. आंदोलनकर्त्यांचा मोर्चा तिथे पोहोचताच या ठिकाणी काही वेळ थांबून जोरदार नारेबाजी करण्यात आली. 'हमे चाहिए आझादी'चे नारेही लगावण्यात आले. सरकार बेरोजगारांची थट्टा करीत होती. आता तर शाळांचे खासगीकरण करण्याचा डाव आखत असल्याने या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, असे नारे देत या ठिकाणी संताप व्यक्त करण्यात आला. मोर्चाची गंभीरता लक्षात घेता मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. (Mahrashtra News )

विविध संघटनांचा सहभाग

चंद्रपुरात निघालेल्या मोर्चात जिल्ह्यातील विविध बेरोजगार तरुणांच्या संघटनांनी सहभाग घेतला होता. खासगीकरणाच्या मुद्द्यावरही अनेक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले. दीक्षाभूमीवरून निघालेला हजारोंचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहाेचला. या मोर्चात विरोधी पक्षांनी सहभाग नोंदवित सरकारचा निषेध केला.

Edited By : Sachin Fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT