Akola Politics News : कंत्राटी कर्मचारी भरतीवरून राज्यभरात गदारोळ झाला. अखेर महायुती सरकारने कंत्राटी कर्मचारी भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, ही भरती प्रक्रिया रद्दच्या निर्णयाचे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि वंचितमध्ये श्रेय घेण्यावरून लढाई सुरू झाली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यातील कंत्राटी भरतीचा शासन निर्णय आम्ही रद्द करत आहोत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कंत्राटी भरतीविरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने झाली होती. यावरून विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले होते. मुंबईत पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्यावर काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला होता. सरकारी नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या तरुण वर्गातही याबाबत तीव्र संताप होता. काँग्रेस पक्षाने तरुण वर्गाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत भाजप सरकारला उघडे पाडले. तरुण वर्गाची नाराजी परवडणारी नाही, निवडणुकीत दारुण पराभव होऊ शकतो हे लक्षात आल्यानेच भाजपप्रणित सरकारवर कंत्राटी पद्धतीच्या नोकर भरतीचा जीआर रद्द करण्याची नामुष्की आली, पण ते करतानाही देवेंद्र फडणवीसांनी त्याचे खापर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर फोडले, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
काँग्रेस पक्षाने कंत्राटी नोकर भरती प्रश्नी महामहीम राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यावेळी राज्यपाल महोदयांनी ही खासगी एजन्सीमार्फत होणाऱ्या कंत्राटी भरतीसंदर्भात आपण लक्ष घालून, असे आश्वासन दिले होते. काँग्रेस पक्षाचा विरोध व राज्यभरातील लाखो तरुणांचा रेटा यापुढे भाजपा सरकारला अखेर झुकावेच लागले, असे पटोले म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करीत हे वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याचे यश असल्याचे म्हटले आहे. शिंदे - भाजप सरकारने घेतलेल्या कंत्राटी भरतीच्या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीने राज्यभर आंदोलने करून हा निर्णय रद्द करण्याची आग्रही भूमिका घेतली होती. वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाने राज्यभरात सातत्याने केलेले आंदोलने, पाठपुराव्यामुळे राज्य सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला आणि आज कंत्राटी भरतीचा जीआर रद्द झाला आहे. आपण या विरोधात मुंबईत पत्रकार परिषद घेत या निर्णयाला प्रखर विरोध दर्शवला होता व सरकारला इशारा दिला होता. वंचित-बहुजन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कदापि खेळू देणार नाही. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनीही या निर्णयाविरोधात राज्यभर प्रभावी आंदोलने करत या निर्णयाविरोधात रान उठवले होते. अखेर सरकारला कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घ्यावा लागला. जोपर्यंत राज्य सरकार सगळ्या रिक्त जागा भरत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीची ही लढाई सुरू राहील, असेही वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
Edited By : Sachin Fulpagare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.